परभणी- जिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या एका बालकाला ४ दिवसानंतर काविळाचा विलाज करण्यासाठी पुन्हा जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु राहत केंद्रात दाखल करण्यात आले होते. परंतु, या ठिकाणी उपचारादरम्यान डॉक्टर अथवा परिचारिकेकडून त्या बालकाच्या मांडीत देण्यात आलेली सुई खुडून मांडीतच राहिल्याचा प्रकार घडला आहे. रुग्णालय प्रशासनाच्या या गलथान कारभारावर सर्व स्तरातून संताप व्यक्त होत असून संबंधित दोषींवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
दिक्षा आतम उंडे (रा. रायपुर ता . सेलु जि. परभणी) असे या महिलेचे नाव आहे. त्या बाळांतपणासाठी २३ जूनला जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यानंतर २४ जूनला त्यांचे सिजर होवून त्यांना मुलगा झाला. मात्र, त्यानंतर त्या बाळाला कावीळाचे लक्षण जाणवल्याने त्याला विशेष नवजात शिशु अति दक्षता कक्षात दाखल करण्यात आले. त्यानंतर बाळाला व आईला दोन दिवसात सुट्टी देण्यात आली. परंतु बाळ सतत जोरजोरात रडत होते. त्याला होणाऱ्या वेदना कोणाच्याही लक्षात येत नव्हत्या, बाळाच्या आईने दवाखान्यातील कर्मचाऱयांना बऱयाच वेळेस विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु बाळ नवीन-नवीन काही दिवस रडत असते, असे म्हणून त्यांना टाळण्यात आले. परंतु १५ दिवसानंतर बाळाची आजी त्याला अंघोळ घालत असताना त्यांच्या हाताला काहीतरी टोचल्याचे जाणवले, त्यावेळी त्यांनी बारकाईने पाहिले असता बाळाच्या मांडीमध्ये इंजेक्शनची सुई निघाली. त्या सुईच्या ठिकाणी बाळाच्या मांडीमध्ये गाठ देखील आली आहे.