परभणी -जीपच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नातून पाथरी-मानवत राष्ट्रीय महामार्गावर दुपारी अपघात झाला आहे. या अपघातात लग्नाला अवघे तीन महिनेच झालेल्या भागवत गोंगे व आरती गोंगे या नवदाम्पत्याला आपला जीव गमवावा लागला आहे.
ओव्हरटेकिंगच्या प्रयत्नात झाला अपघात
पाथरी तालुक्यातील पोहेटाकळी येथील भागवत गोंगे व आरती गोंगे हे नवदाम्पत्य दुचाकीवरून मानवतकडे चालले होते. रत्नापूरजवळ गोंगे यांनी जीपच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, समोरून येणाऱ्या ट्रकवर त्यांची दुचाकी आदळली. या जोरदार धडकेने आरती दूरवर फेकल्या गेल्या आणि पाठीमागून वेगाने येणारी जीप त्यांच्या डोक्यावरून गेली. भागवत हे ट्रकखालीच चिरडल्याने गंभीर जखमी झाले होते. दोन्ही जखमींना गणेश उक्कलकर, दत्ता शिंगणापुरे, दिपक कटारे या युवकांनी एका खासगी दवाखान्यात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी आरती यांना तपासून मृत घोषित केले, तर भागवत यांना पुढील उपचारासाठी परभणीकडे नेण्यात येत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.
भागवत आणि आरती यांच्या लग्नाला फक्त तीनच महिने झाले होते. या घटनेमुळे पोहेटाकळी गावात एकच शोककळा पसरली आहे. घटनास्थळावरुन जीप चालक फरार असून ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.