परभणी- मागील महिन्यात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना संसर्गामुळे हैराण झालेल्या परभणीकरांना मे महिन्याच्या सुरुवातीपासून काहीसा दिलासा मिळत आहे. गेल्या 9 दिवसांत केवळ 2 दिवस वगळता नव्याने आढळून येणाऱ्या कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. तसेच आज रविवारी देखील 1 हजार 37 रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर नव्या 462 बधितांची नोंद झाली आहे. तसेच मृतांचीही संख्या कमी होत असून, 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
9 दिवसात 8083 रुग्ण कोरोनामुक्त
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून परभणीतील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत जात होता. त्यात एप्रिल महिन्यात तर प्रचंड वाढ झाली. गेल्या वर्षभरात आढळलेले रुग्ण एकट्या एप्रिल महिन्यात आढळून आले आहेत. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 43 हजारांच्यावर पोहोचला आहे. मात्र, आता मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासून यात काहीसा दिलासा मिळताना दिसून येत आहे. 1 मेपासून आज 9 मे दरम्यान 2 आणि 6 तारीख वगळता दररोज आढळणाऱ्या बाधितांपेक्षा बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या नऊ दिवसात नव्याने 6607 नवे बाधित आढळले, तर 8083 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
6 हजार 570 बाधितांवर उपचार
शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण ज्या प्रमाणात वाढत होते, आता त्याच प्रमाणात घटतांनाही दिसून येत आहेत. आज रविवारी 462 नवीन बाधित आढळले तर 1037 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच 12 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या जिल्हा रुग्णालय, खाजगी दवाखाने आणि घरी राहून 6 हजार 570 बाधित उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत एकूण 1 हजार 27 करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 42 हजार 970 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 35 हजार 373 व्यक्ती कोरोनामुक्त झाले. दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे आतापर्यंत 2 लाख 63 हजार 239 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले आहेत. त्यात 2 लाख 20 हजार 167 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले, तर 42 हजार 970 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. 1053 अनिर्णायक व 140 नमुने नाकारण्यात आले आहेत.