परभणी - गेल्या 35 वर्षांपासून परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार सातत्याने निवडून येत आहे. पण याच मतदारसंघातल्या भाजप जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी बंडखोरीचा सूर आवळला आहे. एवढेच नव्हे, तर नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या आमदारांनी पक्षविरोधी काम केले. ते चोर आणि गद्दार आहेत, असा गंभीर आरोपही भरोसे यांनी केला. यासंदर्भात गुरुवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत भरोसे बोलत होते. यामुळे परभणी जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शिवसेनेचा आमदार गद्दार - भाजप जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे एकीकडे देशात आणि राज्यात शिवसेना-भाजपच्या युतीचे सूर कुठेतरी जुळत आहेत. मात्र, परभणीत भाजपने बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी परभणीतील शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांच्यावर बेछूट आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार आमदार पाटील हे शासनाने दिलेली कामे आपणच आपल्या निधीतून करत असल्याचा आव आणत आहेत आणि त्याची उद्घाटने करत फिरत आहेत. ते कामांची चोरी करतात ते चोर आहेत, असा आरोप केला.
याशिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमदार पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार खासदार संजय जाधव यांच्या विरोधात काम केले. परभणी विधानसभेत शिवसेनेचा आमदार असून सुद्धा याठिकाणी खासदारांचे 32 हजारांचे मताधिक्य घटले आहे. याचा स्पष्ट अर्थ शिवसेना आमदारांनी गद्दारी केली, असा गंभीर आरोप सुद्धा भरोसे यांनी यावेळी केला. याउलट आम्ही भाजपचे सर्व पदाधिकारी युतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील होते.
दरम्यान, परभणी विधानसभा क्षेत्रातील मतदार शिवसेनेच्या गद्दाराला स्वीकारत नाहीत, असा या ठिकाणचा इतिहास आहे. त्यामुळे युतीमध्ये ही जागा भाजपला सोडण्यात यावी, अशी मागणी आपण पक्षाकडे करत आहोत. आजपर्यंत भाजपने या ठिकाणी बुथ स्तरावर मोठे संघटन उभे केले आहे. मोठ्या प्रमाणात पक्षबांधणी झाली असून पदाधिकारी कामाला लागले आहेत. गेल्या साडेचार वर्षात भाजपने परभणी विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली. या पार्श्वभूमीवर ही जागा भाजपला मिळावी. आणि या ठिकाणी उमेदवार म्हणून आपण इच्छुक असल्याचे देखील आनंद भरोसे यांनी स्पष्ट केले.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष राजेश देशमुख, पदाधिकारी संजय शेळके, मीना परतानी, अंकुश आवरगंड, सुरेश भुमरे, नगरसेविका मंगला मुदगलकरआदींसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.