परभणी - एका असाह्य महिलेचा गैरफायदा घेणे, अवैध व्यावसायिकांकडून पैसे वसूल करणे, तसेच वाळू माफियांकडून माहिनेवारी हप्ता घेण्याचा प्रकार परभणी पोलीस दलातील 3 कर्मचाऱ्यांना चांगलाच अंगलट आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी तिन्ही पोलिसांना निलंबित केल्याचे आदेश बजावले आहेत. त्यामुळे, पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा -'जीएसटी'तील किचकट तरतुदी विरोधात परभणीत आंदोलन
महिनेवारी हप्ता घेत असल्याने पूर्णेच्या कर्मचाऱ्यावर कारवाई
पूर्णा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी विनोद रत्ने हे अवैध वाळूचा उपसा करणाऱ्यांसह ट्रॅव्हल्सधारकांकडून महिनेवारी पैसे वसूल करत असल्याचे सिद्ध झाले होते. स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतला व पदाचा गैरवापर केला असल्याचे त्यांच्या निलंबन आदेशात पोलीस अधीक्षक मीना यांनी म्हटले आहे. तसेच, एक जबाबदार कर्तव्यनिष्ठ पोलीस हवालदार दर्जाचे अंमलदार असतानाही अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालणे अपेक्षित असताना केवळ स्वतःच्या आर्थिक लाभाकरिता अवैधरित्या पैसे घेऊन अवैध धंद्यांना चालना देत असल्याचा कसूर केला असल्याचेसुद्धा रत्ने यांच्या निलंबन आदेशात नोंद करण्यात आले.