महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीचे सुपूत्र तथा त्रिपुरात सेवा बजावणाऱ्या आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे यांचे कोरोनाने निधन - parbhani sudhakar shinde ias officer

परभणीचे भूमिपुत्र तथा त्रिपुरातील आयएएस अधिकारी असणारे सुधाकर शिंदे यांचे कोरोनाने निधन झाले. 2015च्या बॅचचे सनदी अधिकारी सुधाकर शिंदे अत्यंत हुशार होते. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात झाले होते.

dead sudhar shinde
मृत सुधाकर शिंदे

By

Published : Oct 9, 2020, 10:11 PM IST

परभणी -जिल्ह्यातील पालम तालुक्यातील रहिवासी तथा 2015च्या बॅचचे सनदी अधिकारी सुधाकर शिंदे यांचे शुक्रवारी सायंकाळी पुण्यात उपचारादरम्यान कोरोनामुळे निधन झाले. पंधरा दिवसांपूर्वी ते कुटुंबीयांना भेटण्यासाठी आपल्या गावी आले होते. या ठिकाणी तपासणी केल्यानंतर ते कोरोनाबाधित आढळून आले होते.

सुधाकर शिंदे हे परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात असणाऱ्या उमरा काजी या गावचे रहिवासी होते. ते पंधरा दिवसांपूर्वी आपले वडील, भाऊ आणि इतर कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावी आले होते. गावात राहिल्यानंतर ते शेतातील विहिरीत पोहण्यासाठीही गेले होते. मात्र, या ठिकाणी त्यांच्या कानात पाणी गेल्याने त्यांनी नांदेड येथे काही तपासण्या केल्या, तेव्हा त्यात त्यांची कोरोना ची तपासणी निगेटिव्ह आढळून आली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा ते औरंगाबाद येथे आपल्या मोठ्या भावाकडे गेले असता, त्या ठिकाणी त्यांनी पुन्हा तपासणी केल्यानंतर त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना तत्काळ पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, त्याच ठिकाणी उपचारादरम्यान आज (शुक्रवारी) सायंकाळी चार वाजता त्यांचा मृत्यू झाला आहे.

2015च्या बॅचचे सनदी अधिकारी सुधाकर शिंदे अत्यंत हुशार होते. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात झाले होते. त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी शेती असली तरी त्यांचे एक मोठे भाऊ औरंगाबाद येथील खासगी कंपनीत नोकरीला आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे राहून त्यांनी आपले पुढील शिक्षण पूर्ण केले. 2012साली त्यांना राज्यसेवा परीक्षेत अपयश आल्यानंतर त्यांनी पुन्हा 2015साली राज्यसेवा परीक्षेत यश संपादन केले. त्यानंतर त्यांना त्रिपुरा राज्यातील शिक्षण विभागात सहाय्यक सचिव म्हणून सेवा बजावण्याची संधी मिळाली. ते त्याच ठिकाणी कार्यरत होते. 2014साली त्यांचे लग्न झाले होते. त्यांची पत्नीही सनदी अधिकारी असल्याची माहिती आहे. शिंदे यांच्या पश्चात वडील, तीन भाऊ, पत्नी, लहान मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात जाण्याने संपूर्ण परभणी जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details