परभणी- कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी गंगाखेड शहरातून हजारो हात पुढे आले आहेत. विविध सामाजिक संस्थांच्या वतीने काढण्यात आलेल्या मदत फेरीतून लाखोंची रोकड, औषधे, कपड्यांसह जिवनावश्यक वस्तू मोठ्या प्रमाणात जमा झाल्या आहेत. ही मदत थेट सांगलीत वाटप केली जाणार असल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
पूरग्रस्तांना मदत पाठवताना
कोल्हापूर-सांगली भागात पूराने होत्याचे नव्हते करून टाकले आहे. अजूनही अनेक गावांना पुराचा वेढा असून या भागातील रहिवाशांना सर्वच प्रकारच्या मदतीची नितांत आवश्यकता आहे. यात प्रामुख्याने औषधे, कपडे व खाद्य पदार्थांची कमतरता भासत आहे. ही मदत जमा करण्यासाठी गंगाखेड शहरातील मानव मुक्ती मिशन, श्री साई सेवा प्रतिष्ठाण, सवंगडी कट्टा, व्यापारी महासंघ, माजी सैनिक संघटना, पेन्शनर संघ, पद्मश्री.डॉ.विखे पाटील कृषी परीषद, लॉयन्स क्लब जनाई, लॉयन्स क्लब गंगाखेड टाऊन, जमिएत-ए-ऊलमा ए-हिंद, रजा अॅकॅडमी आदी सेवाभावी संस्थांच्या पुढाकारातून ही मदत फेरी काढण्यात आली होती.
गंगाखेडचे तहसीलदार स्वरूप कंकाळ, पोलीस निरीक्षक चोरमले यांच्या प्रमुख उपस्थितीत पूरातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करून फेरीस शिवाजी चौकातून प्रारंभ करण्यात आला. यावेळी सवंगडी कट्टा समुहाच्या वतीने भरीव मदत करण्यात आली. यात औषधे व इतर जिवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. तर महिला सवंगड्यांकडून महिलांसाठी सॅनीटरी पॅड व इतर साहित्य देण्यात आले. तसेच मुस्लीम बांधवांच्या ईद सोहळ्यातील नामाज स्थळावरून हजारो रूपये जमा करण्यात आले. शहरातील सर्वच व्यापारी बांधवांनी रोख व वस्तूंच्या माध्यमातून देणग्या देत आपली दानशूर वृत्ती दाखवून दिली.
दरम्यान, सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा निधी तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना सुपूर्द करण्यात आला. तर जमा झालेले साहित्य थेट पूरग्रस्त भागात पाठवले जाणार आहे. यावेळी साईसेवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गोविंद यादव, मानव मुक्ती मिशनचे ओंकार पवार, धनगर साम्राज्य सेनेचे सखाराम बोबडे, लॉयन्स क्लबचे प्रा. मुंजाजी चोरघडे, संतोष तापडिया, अतुल तुपकर, गजानन महाजन, सवंगडी समुहाचे रमेश औसेकर, प्रकाश घण, मनोज नाव्हेकर, कारभारी निरस, व्यापारी महासंघाचे दगडूसेठ सोमाणी, पेन्शनर संघाचे बाबुराव गळाकाटू, माजी सैनिक संघटनेचे विश्वनाथ सातपुते, संपतराव निरस, डॉ.गोविद मुळे, सिद्धार्थ भालेराव, वर्षा यादव, माधुरी राजेंद्र, सुर्यमाला मोतीपवळे, रेणू घण, सीमा घनवटे, मंगल बोडखे आदींसह विविध सामाजीक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.