परभणी- परभणीमधील गावातील विविध शेतकऱ्यांच्या मेंढ्या चरण्यासाठी नेणाऱ्या 3 मेंढपाळांची रात्रभर मृत्यूशी झुंज अखेर यशस्वी झाली. परभणी तालुक्यातील शिरसी बुद्रुक या गावाच्या जवळून वाहणाऱ्या 2 ओढ्यांना रविवारच्या मुसळधार पावसाने पूर आला होता. या पुराच्या पाण्यात त्यांच्या सुमारे अडीचशे मेंढ्या वाहून जात होत्या. त्यामुळे या मेंढपाळांनी जीवाची बाजी लावून 40 मेंढ्यांना वाचवले. तर स्वतः एका झाडाच्या आधाराने रात्रभर पुराच्या पाण्याशी झगडत राहिले. विशेष म्हणजे यातील 2 मेंढपाळ केवळ 14 आणि 15 वर्षांचे आहेत. दरम्यान, पहाटे पुराचे पाणी ओसरल्यानंतर ते तिघे गावात परतले. त्यांनी ही आपबिती कथन केल्यावर प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली.
परभणीत 3 मेंढपाळांची रात्रभर मृत्यूशी 'झुंज', पुरात सुमारे 200 मेंढ्या गेल्या वाहून मुसळधार पावसाने ओढे-नाले, नद्यांना पूर
परभणी शहर आणि तालुक्यातील बहुतांश भागात आतापर्यंत कधीही झाला नाही एवढा पाऊस अवघ्या काही तासात रविवारी पडला. ज्याची नोंद तब्बल 232 मिलिमीटर एवढी झाली आहे. या प्रचंड पावसामुळे शहरी भागात तर पाणीच पाणी झाले, तर ग्रामीण भागात देखील दाणादाण उडाली. अनेक पिकांचे नुकसान झाले असून, विविध ओढे-नाले आणि नद्यांना पूर आल्याने असंख्य गावांचा संपर्क तुटला. अनेक गावकरी या पुराच्या पाण्यात अडकले. प्रत्येकाने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जीवाची पराकाष्टा केली. यातील एक भयंकर प्रकार परभणी तालुक्यातील शिरसी बुद्रुक याठिकाणी अनुभवयास मिळाला.
मेंढपाळांनी अशी दिली मृत्यशी 'झुंज' -
शिरसी बुद्रुक येथील भारत वैद्य या मेंढपाळांची तब्येत बरी नसल्याने ते दवाखान्यात दाखल आहेत. त्यामुळे काल रविवारी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या काही व गावकऱ्यांच्या मिळून तब्बल 233 मेंढ्या घेऊन त्यांची दोन मुले आदिनाथ वैद्य (14) आणि ओंकार वैद्य (15) यांना मेंढपाळांच्या राखणीसाठी (चरण्यासाठी) पाठवले होते. त्यांच्या सहकार्यासाठी त्यांनी वैजनाथ खराबे या 35 वर्षीय तरुणाला देखील पाठवले होते. हे तिघे जण रविवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान गावाच्या परिसरात मेंढ्या चारत असताना ओढ्याजवळ आले. त्या भागात दोन ओढे जवळून वाहतात. मात्र त्यावेळी जोरदार पाऊस पडत असल्याने त्या ओढ्यांना मोठा पूर आला. पाहता पाहता हे दोन्ही ओढे एक झाले. त्यामुळे पाण्याची गती वाढली. मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. ज्यामुळे या मुलांनी दोन्ही ओढ्याच्या मध्यभागी असलेल्या उंच भागावर आसरा घेतला. मात्र त्या ठिकाणची माती घसरल्याने हे मेंढपाळ मेंढ्यांसह पुराच्या पाण्यात वाहून जात होते. त्याच वेळी मेंढपाळांनी पोहत सुमारे 40 मेंढ्यांना पकडून पाण्याच्या बाहेर काढले. मात्र, पाण्याचा वेग वाढत असल्याने ते देखील पुराच्या पाण्यात वाहून जात होते. त्यामुळे त्यातील वैजनाथ खराबे यांनी ओंकार आणि आदिनाथ या दोघांना एका लिंबाच्या झाडाला पकडून थांबण्यास सांगितले. त्यामुळे ते दोघेही झाडावर जाऊन बसले आणि वैजनाथ काही शेळ्या वाचतील का, हे पाहण्यासाठी पुन्हा ओढ्याच्या पाण्यात पोहत पुढे गेला. मात्र पाण्याचा जोर वाढल्याने त्याचेही नियंत्रण सुटले. परंतु सुमारे चार ते पाच तासानंतर तो देखील या मुलांजवळ पोहोचला. एकूणच रात्रभर या तीनही मेंढपाळांची मृत्यूशी झुंज सुरूच होती. सकाळी पाच वाजता जेव्हा ओढ्याचा पूर ओसरला, तेव्हा हे तिघेही गावात परतले. त्यांनीही आपबिती सांगितल्यावर गावकऱ्यांनी तात्काळ प्रशासनाला कळवले.
सुमारे दीडशे मेंढ्या मृत अवस्थेत सापडल्या -
दरम्यान, घटनास्थळी मंडळ अधिकारी, तलाठी, पशुसंवर्धन विभागाचे काही अधिकारी दाखल झाले. त्यानंतर पोलीस व इतर कर्मचार्यांच्या मदतीने सुमारे 2 किमीपर्यंत वाहून गेलेल्या मेंढ्या शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सुमारे दीडशे मेंढ्या मृत अवस्थेत आढळल्या. तर उर्वरित मेंढ्या वाहून गेल्याची माहिती तलाठी एस. एस. मोरे यांनी दिली.
वीस लाखांहून जास्त नुकसान -
दरम्यान, या दुर्घटनेत गावातील शेतकऱ्यांचे 20 लाख रुपयांहून अधिकचे नुकसान झाले आहे. गावातील 10 शेतकऱ्यांच्या मेंढ्याचा वैद्य कुटुंबीय सांभाळ करत होते. मात्र, निसर्गाच्या कोपामुळे या शेळ्यांना जीव गमवावा लागला. सुदैवाने हे मेंढपाळ वाचल्याने गावातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
हेही वाचा -Heavy Rain : रत्नागिरीतील राजापुरात पूरस्थिती, बाजारपेठेला पुराच्या पाण्याचा वेढा