परभणी - परभणी तालुक्यासह जिल्ह्यातील काही भागात आज सायंकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास पावसाने जोरदार वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. यामध्ये गहू, ज्वारी या पिकांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. शिवाय फुलोऱ्यात आलेल्या आंबा पिकाला देखील याचा मोठा फटका बसला आहे. या नुकसानीचे प्रशासनाने पंचनामा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसापासून तापमानात मोठी वाढ होत आहे. असे असले तरी दिवसा 35 ते 38 अंश सेल्सिअस दरम्यान राहणारे तापमान सायंकाळी दहा ते पंधरा अंशावर येऊ लागले आहे. त्यामुळे दिवसा उष्णता आणि रात्रीच्या वेळी थंडी, असे विचित्र वातावरण गेल्या काही दिवसात निर्माण झाले आहे. यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत होती. त्यातच आज (सोमवारी) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास परभणी शहर तसेच तालुक्यातील खानापूर, कारेगाव, असोला, पांढरी, सिंगणापूर, बाभळी, जाम, बोरवंड, ब्राह्मणगाव आदी परिसरात वादळी वारे वाहिल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटे जोरदार पावसाने हजेरी लावली. याशिवाय परभणी जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये देखील रिमझिम पाऊस पडला.