परभणी -जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. पावसाच्या जोरदार तडाख्यामुळे पिकांची अक्षरशः धूळधाण झाली आहे. तर, सततच्या पावसाने रब्बीची पेरणीही खोळंबली आहे. त्यामुळे प्रशासनाने आता नुकसान भरपाईसाठी अर्जाची प्रतिक्षा न करता, थेट बांधावर येऊन पंचनामे करावेत आणि तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार सुरेश जाधव यांनी पालम प्रशासनाला निवेदन दिले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडे किंवा कुठेही निवेदन देण्यास सांगू नये, अशी मागणी केली आहे. तर, काही शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाल्यामुळे, शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करावी, आणि शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई, द्यावी अशी मागणीही केली आहे.
दरम्यान, परभणी जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या चार महिन्यात केवळ सरासरीच्या 75 टक्के पाऊस झाला होता. परंतु, ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून परतीचा पाऊस जिल्ह्याला झोडपून काढत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या 15 दिवसात तब्बल 300 टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्याची पावसाने सरासरी ओलांडली असून, काल सकाळीपर्यंत परभणी जिल्ह्यात 103 टक्के पाऊस झाला होता. काल दिवसभर देखील पावसाची रिमझिम अनेक ठिकाणी सुरू होती.