परभणी - जिल्ह्यात रात्री 10.30 वाजल्यापासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रात्रभर धो-धो बरसलेल्या या पावसाने सेलू आणि पाथरी तालुक्यात अतिवृष्टी नोंदविण्यात आली आहे. शिवाय शहरात देखील 100 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. ज्यामुळे रस्ते जलमय झाले आहेत. दरम्यान, या पावसामुळे काढणीला आलेल्या तसेच कापून ठेवलेल्या सोयाबीनचे आणि कापसाचे मोठे नुकसान होत आहे. तर, शेतकरी हवालदिल झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
हेही वाचा -वडोदरमध्ये कोसळली इमारत; 7 जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती
जिल्ह्यात मोसमाच्या सुरवातीला पडलेल्या पावसानंतर मध्यंतरीच्या काळात पावसाने मोठा खंड दिला होता. नंतर थोड्याफार प्रमाणात आलेल्या पावसामुळे पिकांनी पिकांना जीवदान मिळत गेले. मात्र, आता परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेले 10 दिवस गायब झालेला परतीचा पाऊस पुन्हा एकदा सुरू झाला आहे. शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास जिल्ह्यात सर्वत्र परतीच्या पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्री पासून पहाटेपर्यंत धो-धो बरसलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.
हेही वाचा -बीडमध्ये मतदारांना पैसे वाटताना एकाला अटक
शेतांमध्ये पीके काढणीला आली आहेत. तसेच अनेकांनी सोयाबीन कापून शेतांमध्ये राशी लावल्या आहेत. या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे. शिवाय कापसाचे देखील या पावसामुळे नुकसान होत असल्याचे शेतकरी सांगतात. दरम्यान, जिल्ह्यातील सेलू आणि पाथरी तालुक्यांमध्ये अनुक्रमे 117.80 आणि 66.33 मिलिमीटर पाऊस पडल्याने अतिवृष्टी नोंदविण्यात आली आहे. तसेच परभणी शहरात देखील रात्रीतून तब्बल 107 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागात नोंदविण्यात आली आहे.
काय सांगते पावसाची आकडेवारी ?
जिल्ह्याची पावसाची सरासरी 774.62 मिलिमीटर आहे. त्यापैकी आतापर्यंत 642.90 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अपेक्षित पावसाच्या 85 टक्के एवढा पाऊस आहे. तर गेल्या 24 तासात 9 तालुक्यांमध्ये सरासरी 44.73 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये सेलू 117.80, पाथरी 66.33 या दोन तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तर परभणी तालुक्यात गेल्या 24 तासात 48.78 मिलिमीटर तर पालम 24.67, पूर्णा 45.40, गंगाखेड 12.25, सोनपेठ 8, जिंतूर 24.33 आणि मानवत तालुक्यात 55 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, या मोसमात पालम आणि पाथरी या तालुक्यात 100 टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. तर परभणी तालुक्यात मात्र, केवळ 62 टक्के पावसाची नोंद झाल्याने काही प्रमाणात टंचाई सदृश्य परिस्थिती आहे.