परभणी- जिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या एका शिपायाने कोरोनाच्या संसर्गात 'मला शासकीय घर मिळावे', अशी मागणी करत जिल्हा शल्य चिकित्सक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला. मात्र, वारंवार विनंत्या करूनही घर मिळत नसल्याने वैतागलेल्या या कर्मचाऱ्याने आज (शनिवारी) जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन विष प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु, तत्पूर्वीच पोलिसांनी त्याला रोखल्याने पुढील अनर्थ टळला.
अनिल गायकवाड, असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते जिल्हा रुग्णालयात कक्ष सेवक म्हणून कार्यरत आहेत. कोरोनाच्या संसर्गामुळे त्यांना कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी चांगले शासकीय निवासस्थान हवे आहे. यासाठी त्यांनी ८ ऑगस्टला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांना अर्ज केला होता. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना देखील त्यांनी घरासाठी मागणी अर्ज केला. त्यानंतर वारंवार या दोघांकडेही चकरा मारल्या, परंतु कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी यासंदर्भात निवेदन देऊन आत्महत्येचा इशारा दिला होता.
त्यानंतर गायकवाड हे आज दुपारी (शनिवारी) परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. या ठिकाणी त्यांनी आपल्या पिशवीतून विष असलेली बॉटल काढून ती पिण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रकार त्याठिकाणी ड्युटीवर असलेल्या पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी गायकवाड यांना रोखले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. यानंतर पोलिसांनी गायकवाड यांना ताब्यात घेऊन नवामोंढा पोलीस ठाण्यात नेले. या प्रकरणी पोलिसांकडून वरिष्ठांना कळवून पुढील कारवाई करण्यात आली.