परभणी -येथील जिल्हा रुग्णालयात सारी वार्डातील एका 65 वर्षीय रुग्णाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी आज (शनिवार) पहाटे प्रचंड गोंधळ घातला. या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना नातेवाईकांनी मारहाण करण्याचा देखील प्रयत्न केला. त्यानंतर खासदार संजय जाधव, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर आणि पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी भोंगळ कारभार करणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांच्यासह वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
परभणीच्या परसावत नगरात राहणाऱ्या 65 वर्षीय व्यक्तीची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील सारी वार्डात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र प्रकृती गंभीर बनल्याने या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येते.
प्रकृती गंभीर होऊनही ऑक्सिजन देत नव्हते -
दरम्यान, रुग्णाची प्रकृती गंभीर होत होती, तरी देखील त्यांना ऑक्सिजन देत नव्हते. कर्मचाऱ्यांना वारंवार सांगून देखील ते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. याच कारणावरून त्यांनी तेथे चांगलाच गोंधळ घातला. तसेच यावेळी तेथे उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचार्यांना मृत्यूचे नेमके कारण विचारण्याचा प्रयत्न केला असता, कर्मचार्यांनी पळ काढल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.
आश्वासनानंतर संतप्त नातेवाईक शांत -
नातेवाईकांच्या गोंधळामुळे कर्मचाऱ्यांनी तेथून पळ काढल्यानंतर नातेवाइकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तात्काळ पोलीस बोलावून सदर रुग्णाच्या नातेवाईकांना शांत केले. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश डाके यांनी सारी वॉर्डला भेट देवून नातेवाइकांशी चर्चा केली. तसेच या प्रकरणी आपण चौकशी करू, असे आश्वासन दिल्यानंतर संतप्त झालेले नातेवाईक शांत झाले होते. दरम्यान, सारी वॉर्डात आणखी दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, ते रुग्ण देखील गंभीर असल्याचे रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात येत आहे.
हेही वाचा -आज संपणार सचिन वाझेची कोठडी; वाझेला हृदयविकाराचा त्रास असल्याची वकिलांची माहिती
खासदार, जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला झापले -
सारी वार्डातील रुग्णांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय जाधव, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी तात्काळ बैठक घेऊन जिल्हा शल्यचिकीत्सकांसह तेथील वैद्यकीय अधिकार्यांना चांगलेच झापले. तसेच जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी आरोग्य उपसंचालकांशी मोबाईलवरून जिल्हा शासकीय रुग्णालयात सुरू असलेल्या भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना, जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार मुळीक, उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, उपविभागीय अधिकारी महेश वडदकर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे, अतिरीक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.प्रकाश डाके, तहसीलदार संजय बिरादार यांच्यासह पोलिस निरीक्षक रामेश्वर तट, सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी तिप्पलवाड, प्रवीण धुमाळ आदींसह जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
उडवा-उडवीची उत्तरे देणारे अधिकारी फैलावर -
सदर बैठकीत जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.नागरगोजे यांनी वैद्यकीय अधिकार्यांना जबाबदार्या वाटप करून दिल्या नसल्याची बाब समोर आली. तसेच फिजीशियन सारी व कोरोनावार्डाकडे फिरकत नसल्याचेही उघडकीस आले. त्यामुळे उपस्थित फिजीशियन आपापल्या जबाबदार्या सांगत मी का तिकडे जाऊ, माझे काम नाही, मला लिखीत स्वरूपात आदेश नाहीत, अशी उडवा-उडवीची उत्तरे देत होते. त्यामुळे जिल्हाधिकारी मुगळीकर, खासदार जाधव यांच्यासह जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी या सर्व अधिकार्यांना चांगलेच फैलावर घेतले. 'वैद्यकीय अधिकार्यांची जबाबदारी जिल्हाधिकारी, एसपी सांगत असतील तर तुमचे काय काम ? या शब्दात जिल्हाधिकार्यांनी शल्यचिकित्सक डॉ.नागरगोजे यांना चांगलेच झापले.
घटनेची अतिरिक्त जिल्हाधिकार्यांमार्फत चौकशी -
सदर प्रकाराची अतिरिक्त जिल्हाधिकार्यांमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. दरम्यान, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे, अतिरीक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. प्रकाश डाके यांनी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसेच सहाय्यक निरीक्षक बालाजी तिप्पलवाड यांच्यासह अन्य पोलिस अधिकाऱ्यांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नातेवाईक आपल्या आरोपांवर ठाम होते. त्यामुळे या पूर्ण घटनेची चौकशी अतिरीक्त जिल्हाधिकार्यांमार्फत केली जाईल. तसेच दोषींवर कारवाई करण्यात येईल, असेही यावेळी जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी सांगितले.
हेही वाचा -पुण्यात मिनी लॉकडाऊनचा पहिला दिवस; पाहा काय आहे परिस्थिती