परभणी -जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 30 मिलिमीटर पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे चालू मोसमातील हा पहिलाच मोठा पाऊस आहे. कारण यापूर्वी एका दिवसात सरासरी 12 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस या भागात कधीही पडला नाही. दरम्यान, आजही सकाळपासून पावसाची संततधार सुरूच आहे. रिमझिम बरसणाऱ्या या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असले, तरी वर्षभर लागणाऱ्या पाण्यासाठी आणि रब्बीच्या पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.
परभणीत पहिल्यांदाच सरासरी 30 मिमी पाऊस, संततधार सुरूच - haivy rain
परभणी जिल्ह्यात एका दिवसात सरासरी 12 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस या भागात कधीही पडला नाही. दरम्यान, आजही सकाळपासून पावसाची संततधार सुरूच आहे. रिमझिम बरसणाऱ्या या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असले, तरी वर्षभर लागणाऱ्या पाण्यासाठी आणि रब्बीच्या पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. रिमझिम पाऊस असला तरीही संततधार बरसणाऱ्या या पावसामुळे काही प्रमाणात समाधान व्यक्त होऊ लागले आहे. दरम्यान, जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने पाठ फिरवली होती. थेट 22 जूनला परभणी जिल्ह्यात प्रत्यक्ष मान्सूनला सुरुवात झाली. त्यानंतर काही दिवस रिमझिम बरसलेल्या पावसाने पुन्हा 15 दिवसांचा खंड दिला आणि जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पुनरागमन केले. त्यानंतर अधून-मधून रिमझिम बरसणारा पाऊस पिकांना जीवदान देणारा ठरला. परंतु दरम्यानच्या काळात तापमानात मोठी वाढ झाली होती. कडक उन्हामुळे पिकांनी माना टाकल्या होत्या. नदी, नाले, ओढे आणि तळ्यांना पाणी नसल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जनावरे विक्रीसाठी बाजारात आणली होती. परंतु सध्याच्या परिस्थितीत जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही तात्पुरता मिटला आहे. पिकांनाही पाणी उपलब्ध होत आहे. असे असले तरी अजूनही परभणी जिल्ह्यात म्हणावा तसा मोठा पाऊस झालेला नाही. परभणी जिल्ह्याची वार्षिक सरासरी 774.62 मिलिमीटर असून त्यापैकी 225.6 मिलिमीटर पाऊस आतापर्यंत पडला आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ 29 टक्के तर अपेक्षित पावसाच्या 63 टक्के एवढा आहे.
तालुकानिहाय पावसाची आकडेवारी -
जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी मानवत तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक 275 तर चोवीस तासात 28 मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्याखालोखाल पूर्णा 272 मिमी (49.40), जिंतूर 250 मिमी (34.17), सोनपेठ 223 मिमी (22), गंगाखेड 209 मिमी (30.25), परभणी 203 मिमी (33.50), सेलू 200 मिमी (28.60) आणि सर्वात कमी पाऊस पालम तालुक्यात 189 (29.67) मिलिमीटर एवढा झाला आहे.