परभणी -नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने 4 लाख 95 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सय्यद तौहीद सय्यद रफिक (वय २४) आणि शुभम मारोती तावडे (वय २०) अशी आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा -अन्न व औषध प्रशासन विभागाच्या गोडाऊनमधून 3 लाखांचा गुटखा चोरी
शहरातील पाथरी रस्त्यावरून गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आज (14 डिसेंबर) पाथरी रस्त्यावर पोलिसांनी गस्त घालण्याचे काम सुरू केले. तेव्हा पोलिसांनी पिकअप वाहन क्रमांक एमएच 22 एए 1741 ताब्यात घेऊन वाहनाची पाहणी केली. या वाहनात प्रतिबंधीत गुटखा आणि सुंगधीत पान मसाला आढळून आला. पोलिसांनी वाहन, आरोपींचे मोबाईल फोन तसेच गुटखा असा एकूण ८ लाख २ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने याप्रकरणी पंचनामा केला आहे. तर, नानलपेठ पोलीस ठाण्यात अन्न भेसळ अधिकारी कच्छवे यांच्या तक्रारीवरून सय्यद रफिक व चालक शुभम तावडे यांच्याविरूद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. हा गुटखा आरोपींनी कुठून आणला, कुणाच्या मालकीचा आहे, याबाबत पुढील तपास नानलपेठ पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकान्त उपाध्याय, अपर पोलीस अधीक्षक रागसुधा आर., पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न भेसळ अधिकारी कच्छवे, हनुमंत जक्केवाड, बाळासाहेब तुपसूंदरे, मधुकर पवार, शरद मुलगीर, पोलीस नाईक शिवा धुळगुंडे, किशोर चव्हाण, संजय घुगे यांनी केली आहे.