परभणी - वरिष्ठ अंतर जिल्हा व राज्यस्तरीय अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचे काल (मंगळवारी) येथे शानदार उद्घाटन झाले. येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे 350 खेळाडू दाखल झाले आहेत. ही स्पर्धा 18 ऑगस्टपर्यंत चालणार आहेत.
परभणीत राज्य अजिंक्य बॅडमिंटन स्पर्धेचे शानदार उद्घाटन या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महापौर मीना वरपूडकर होत्या. तर जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, स्थायी समितीचे सभापती सुनील देशमुख, राज्य संघटनेचे मंगेश काशीकर, बालकिशन चौधरी, मनपा उपायुक्त जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी पी.शिवशंकर म्हणाले, दहा ते पंधरा वर्षापूर्वी बॅडमिंटनमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या. तरी देखील खेळाडूनी या क्षेत्रात नावलौकिक मिळविण्यास सुरुवात केली. ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे खेळाडू बॅडमिंटनमध्ये पोहोचले आहेत. त्याच बरोबर शासनाकडूनही या खेळाडूंसाठी जिल्हा ते गावपातळीपर्यंत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक ठिकाणी सिंथेटिक मॅटवर हा खेळ खेळला जाऊ लागला आहे. यातून चांगले खेळाडू नावारूपाला येत आहेत. परभणीत गेल्या काही वर्षांपासून होत असलेल्या राज्यस्तरीय स्पर्धांमुळे क्षेत्रात लौकिक प्राप्त झाला आहे, असेही जिल्हाधिकारी पी. शिवशंकर म्हणाले.
तर पोलीस अधीक्षक उपाध्याय यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोप महापौर वरपूडकर यांच्या भाषणाने झाला. प्रस्तविक जिल्हा संघटनेचे सचिव रवी पतंगे-देशमुख यांनी तर सचिन अंबिलवादे यांनी आभार मानले. कार्यक्रमास संघटनेचे अध्यक्ष विजय जामकर, सचिव रवी देशमुख-पतंगे, उपाध्यक्ष सचिन अंबिलवादे, सुधीर मांगूळकर, आशिष शहा, डॉ.शाम जेथलिया, विनोद जेठवाणी, नरेंद्र झांझरी, पांडुरंग कोक़डे, उन्मेष गाडेकर आदी उपस्थित होते.