महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'लॉकडाऊन'मध्ये शिथिलता द्या, परभणीच्या खासदारांसह आमदारांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी - दीपक मुगळीकर

परभणी जिल्ह्यातील आर्थिक चक्र फिरवे यासाठी लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथीलता आणावी, या मागणीसाठी परभणीचे खासदार संजय जाधव व आमदार डॉ. राहूल पाटील यांनी आज शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची भेट घेतली.

भेटी दरम्यानचे छायाचित्र
भेटी दरम्यानचे छायाचित्र

By

Published : May 8, 2020, 8:58 PM IST

परभणी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दीड महिन्यापासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे अनेक व्यापारी अडचणी आले आहेत. अनेक रोजगार बंद पडण्याची वेळ आली आहे. पण, आता जिल्ह्यात कोरोना संसर्ग झालेला एकही रुग्ण नाही. त्यामुळे सोमवार (11 मे) पासून जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देऊन हळू-हळू दुकाने सुरु करण्याची परवानगी द्यावी, या मागणीसाठी परभणीचे खासदार संजय जाधव व आमदार डॉ. राहूल पाटील यांनी आज शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची भेट घेतली.

कोरोना रुग्णाच्या वारंवारिते नुसार राज्य शासनाने जिल्ह्याचे तीन भागात वर्गीकरण केले आहे. यात ग्रीन, ऑरेंज व रेड हे तीन भाग असून परभणी जिल्हा हा सध्या ऑरेंज झोनमध्ये आहे. आता लवकरच तो ग्रीनमध्ये जाईल. राज्यातील ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये असणाऱ्या काही जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तेथील व्यवहार काही अंशी सुरु झाले आहेत. परिणामी रोजगार पुन्हा सुरु झाल्याने त्या जिल्ह्यातील आर्थिक चक्र फिरण्यास सुरुवात झाली आहे.

परभणी जिल्हा हा देखील ऑरेंज झोनमध्ये असल्याने या जिल्ह्यातही लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात यावी, अशी मागणी व्यापारी संघटनानी केली होती. या संदर्भात काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार संजय जाधव व आमदार डॉ. राहूल पाटील यांची भेट घेवून अडचण व्यक्त केली होती. या संदर्भात खासदार संजय जाधव व आमदार डॉ. राहूल पाटील या दोघांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी मुगळीकर यांची भेट घेतली. त्यांना लॉकडाऊनमध्ये आपल्या जिल्ह्याला शिथिलता द्यावी, अशी विनंती केली. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील यावर सकारत्मक विचार केला जाईल, असे आश्वासन दोन्ही नेत्यांना दिले आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून जिल्ह्यात लॉकडाऊन शिथील केले जाण्याची शक्यता आहे.

व्यापाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे - खासदार जाधव

लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळावी, अशी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आहे. त्यांनी सकारात्मकता दाखविली आहे. पण, लॉकडाऊन उठल्यानंतर व्यापाऱ्यांनी स्व:ताची काळजी घेतली पाहिजे. सामाजीक अंतराचे तंतोतंत पालन केले पाहिजे. व्यापाऱ्यांनी दुकानात जास्त गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल, असे आवाहन खासदार संजय जाधव यांनी केले आहे.

लोकांनीही गर्दी करू नये- आमदार डॉ. पाटील

लॉकडाऊनमध्ये शिथीलता आली म्हणजे कोरोनाचा संसर्ग संपला असे होत नाही. ही लढाई अजूनही चालणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊनला शिथिलता मिळाली तरी लोकांनी बाजारात विनाकारण गर्दी करू नये. शासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे, तरच या संसर्गापासून आपला जिल्हा वाचेल, असे यासंदर्भात बोलताना आमदार डॉ. राहुल पाटील म्हणाले.

हेही वाचा -परभणीत लॉकडाऊन काळात 1 हजार 283 जणांवर गुन्हे दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details