परभणी- आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे रवाना झालेल्या शेगावच्या गजानन महाराजांची पालखी शनिवारी परभणीत दाखल झाली. शहरातील वसमत रोडपासून ते नवा मोंढा भागातील रोकड हनुमान मंदिरापर्यंत ठिकठिकाणी या पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी गजानन महाराजांच्या मुर्तीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
शेगावच्या 'राणां'चे परभणीत ठिकठिकाणी स्वागत, दर्शनासाठी गर्दी - हनुमान मंदिरापर्यंत
आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे रवाना झालेल्या शेगावच्या गजानन महाराजांची पालखी आज शनिवारी परभणीत दाखल झाली. पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी गजानन महाराजांच्या मुर्तीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
![शेगावच्या 'राणां'चे परभणीत ठिकठिकाणी स्वागत, दर्शनासाठी गर्दी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3641304-thumbnail-3x2-parbhani.jpg)
गजानन महाराजांची पालखीचा दरवर्षी परभणीत मुक्काम असतो. तत्पूर्वी, वसमत रोडवरील झिरो फाटा येथे शुक्रवारी रात्री मुक्काम केल्यानंतर या पालखीचे शनिवारी परभणी शहराकडे प्रस्थान झाले. सकाळी श्री क्षेत्र त्रिधारा येथे दिंडीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ही पालखी वसमत रोडवरील कडूबाईचा मळा येथे दाखल झाली. या ठिकाणी वारकऱ्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच संपूर्ण वसमत रस्त्यावर पालखीचे ठिकाणी फुल-गुलालाने स्वागत करण्यात आले.
वारकऱ्यांसाठी विविध मिष्ठान्न फळ आदीची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी तीन वाजता ही पालखी नवा मोंढा येथील रोकड हनुमान मंदिरात पोहोचली. या ठिकाणी काही काळ विश्रांतीनंतर पालखीने सायंकाळी परभणी शहरातील गांधी पार्क शिवाजी चौक या भागातून पुन्हा रोकडा हनुमान मंदिरापर्यंत फेरी मारली. रविवारी सकाळी पालखीने गंगाखेडकडे प्रस्थान केले. रविवारी पालखीचा मुक्काम धाकले पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाकूर बुवाच्या दैठणा या श्रीक्षेत्री असणार आहे.