महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'याच गर्दीत चेंगरून मरणार कोरोना' ! परभणी बसस्थानकात 'सोशल-डिस्टन्स'चा फज्जा - parbhani corona latest news

सर्व व्यवहार सुरू झाले असून कामगारवर्ग कामावर परतण्यास धडपडत आहे. त्यांची हीच धडपड प्रचंड गर्दीला कारणीभूत ठरताना दिसत आहे. सुरुवातीला बसमध्ये 21 प्रवाशांनाच बसण्याची परवानगी होती. गर्दी वाढत असताना हे बंधन कायम ठेवून जादा बस सोडणे आवश्यक होते. मात्र, परिवहन महामंडळाने तसे न करता पूर्ण क्षमतेने बस सेवा सुरू करण्याचे फर्मान सोडले. आता बसमध्ये सर्व आसनांवर प्रवाशांना बसवले जात आहे. एवढेच नव्हे तर, बसमध्ये उभे राहून प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.

परभणी बसस्थानक न्यूज
परभणी बसस्थानक न्यूज

By

Published : Sep 26, 2020, 1:03 PM IST

परभणी - 'कोरोना'च्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी 'सोशल-डिस्टन्स पाळा, मास्क वापरा आणि वारंवार हात स्वच्छ धुवा' या त्रिसूत्रीचा अवलंब करा, असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात या उपाययोजनांची अंमलबजावणी शासकीय ठिकाणांवरच होताना दिसत नाही. परभणीच्या बस स्थानकात एवढी गर्दी उसळत आहे की, 'या गर्दीत कोरोनाच चेंगरून मरतो की काय,' अशी उत्स्फूर्त आणि उपहासात्मक प्रतिक्रिया प्रत्येकाच्या मनात येऊ लागली आहे. भयंकर गर्दी होत असतानाही एसटी प्रशासन मात्र कुठल्याही उपाययोजना करताना दिसत नाही. त्यामुळे परभणीच्या बस स्थानकातून मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

'याच गर्दीत कोरोना चेंगरून मरणार' ! परभणी बसस्थानकात 'सोशल-डिस्टन्स'चा फज्जा

परभणी जिल्ह्यात लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या दीड महिन्याच्या कालावधीत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नव्हता. मात्र, अनलॉकची प्रक्रिया सुरू होताच परभणीत मोठ्या शहरातून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत गेली आणि सोबतच कोरोनाबाधितांची संख्या सुद्धा दिवसागणिक वाढत आहे. या घडीला जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या पाच हजारांच्या पुढे गेली आहे. शिवाय, सव्वादोनशे कोरोनाबधितांचा बळी गेला आहे. दररोज शंभरहून अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत, असे असले तरी कोरोनाच्या संसर्गाचे गांभीर्य कोणालाच दिसत नाही.

व्यवहार सुरू झाले असून कामगारवर्ग कामावर परतण्यास धडपडत आहे. त्यांची हीच धडपड प्रचंड गर्दीला कारणीभूत ठरताना दिसत आहे. परभणी बस स्थानकातून पूर्ण क्षमतेने बस सेवा सुरू झाली आहे. पूर्वीप्रमाणे सर्व मार्गांवर बस सोडण्यात आल्या आहेत. सुरुवातीचा दीड महिना बसमध्ये 21 प्रवासी बसून प्रवास करणे बंधनकारक होते. परंतु, गर्दी वाढत असताना हे बंधन कायम ठेवून जादा बस सोडणे आवश्यक होते. मात्र, परिवहन महामंडळाने तसे न करता पूर्ण क्षमतेने बस सेवा सुरू करण्याचे फर्मान सोडले. त्यानुसार, आता बसमध्ये सर्व आसनांवर प्रवासी बसवून बससेवा सुरू आहे. एवढेच नव्हे तर, अनेक बसमध्ये उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही आता वाढली आहे.

त्यानुसार परभणीच्या बस स्थानकात औरंगाबाद-नांदेडसह अनेक बस गाड्यांना प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले. रेल्वे सेवा बंद असल्याने परभणीतून औरंगाबाद व नांदेड या मार्गावर मोठ्याप्रमाणात बस धावत आहेत. त्यात प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशी प्रचंड गर्दी करत आहेत. मात्र या गर्दीला आवरण्यासाठी परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापनाने कुठल्याही ठोस उपाययोजना केलेल्या दिसत नाही. प्रवाशांच्या गर्दीला शिस्तीत बसमध्ये चढण्यासाठी रांगा लावून उपाययोजना केल्या जाऊ शकतात. मात्र तसे होताना दिसत नाही. परभणीचे बस स्थानक तात्पुरत्या त्या जागेत सुरू आहे. नवीन बस स्थानकाचे बांधकाम गेल्या दोन वर्षांपासून रेंगाळले आहे. त्यामुळे बस स्थानकात एकतर फलाटांसाठी जागा अपुरी आहे आणि त्यातच कुठलाही उपायोजना नसल्याने गर्दी अनियंत्रित होत आहे.

एकीकडे कोरोनाच्या महामारीत सुरक्षित प्रवास म्हणून परिवहन महामंडळ एसटी बसची जाहिरात करते. सोशल डिस्टन्सचे पालन करून सर्वांना मास्क बंधनकारक करण्यात आले असल्याचे सांगण्यात येते. शिवाय 'प्रवाशांच्या हातावर सॅनिटायझर मारूनच आम्ही त्यांना बस मध्ये बसवतो', असा दावा देखील परिवहन महामंडळाकडून होते. मात्र, प्रत्यक्षात असल्या कुठल्याही उपाययोजना परभणीच्या बसस्थानकात होताना दिसत नाही. त्यामुळे कोरोना सारखा भयंकर संसर्ग याच बसस्थानकातून वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. याकडे आता लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details