परभणी - पठाणकोट येथील वातावरणामुळे जवान जिजाभाऊ मोहिते यांची काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडली होती. उपचारादरम्यान प्रकृती खालावल्याने त्यांना वीरमरण आले. त्यांच्यावर शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास त्यांच्या मूळगावी महागाव (ता.पूर्णा) येथे साश्रुनयनांनी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुष्पचक्र वाहून अर्पण केली श्रध्दांजली या अंत्यसंस्कार प्रसंगी प्रारंभी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी हुतात्मा जिजाभाऊ यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. तसेच यावेळी खासदार संजय जाधव, नांदेडचे आमदार मोहन हंबर्डे, तहसीलदार पल्लवी टेमकर, सैनिक कल्याण कार्यालयाचे पाटील तसेच अनेक पक्षाचे पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिकांनी शोकाकूल वातावरणात पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली अर्पण केली.
बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना - बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना -
हुतात्मा जवान जिजाभाऊ यांच्या कुटुंबियांनी धार्मिक रितीनूसार अंत्यविधी पूर्ण केला. तत्पुर्वी, पोलीस दलाच्या तुकडीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली. तसेच हवाई दलाच्यावतीने पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. यावेळी बँड पथकांने शोकधून वाजवली. तिरंग्यामधील शहीद जिजाभाऊचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
शोकाकूल वातावरणात मिरवणूक शोकाकूल वातावरणात मिरवणूक -
हवाई दलात पठाणकोट येथे तैनात असलेले भारतीय जवान जिजाभाऊ मोहिते हे गुरुवारी रात्री शहीद झाले होते. काल शनिवारी (29 मे रोजी) रात्री 9 वाजता त्यांचे पार्थिव हैद्राबादमार्गे महागाव या गावी आणण्यात आले. तेथून शोकाकूल वातावरणात मिरवणूकीने गावकऱ्यांनी महागाव येथे पार्थिव आणले. त्यानंतर गावातील व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अंतिम दर्शन घेतले.
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून हवाई दलात झाली होती निवड -
हुतात्मा जिजाभाऊ मोहिते यांचे पहिले ते सातवी पर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले. तर आठवी ते दहावीचे शिक्षण खाजगी शाळेत झाले होते. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पालम, परभणी येथे घेतले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी केली. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांची हवाई दलात निवड झाली होती.
वातावरणाचा सामना करताना आले वीरमरण -
पठाणकोट येथील वातावरणामुळे मोहिते यांची काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडली होती. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मागील चार-पाच दिवसापूर्वी त्यांची प्रकृती आणखीनच खालावली. अखेर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यातच त्यांची गुरुवारी रात्री प्राणज्योत मावळून त्यांना वीरमरण आले.
हेही वाचा - शहीद जवान मोहिते यांच्यावर महागाव येथे होणार अंत्यसंस्कार