परभणी -बँक कर्ज देत नसल्याच्या कारणास्तव पाथरी शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी पीक कर्जासाठी बँक व्यवस्थापकाला घेराव घालून दालनात ठिय्या आंदाेलन करण्यात आले.
पीक कर्जासाठी बँक व्यवस्थापकाला शेतकऱ्यांचा घेराव हेही वाचा-पुण्यात शिवसैनिकांचा राडा; पीक विम्याच्या पैशांसाठी फोडले विमा कंपनीचे कार्यालय
पाथरीच्या महाराष्ट्र बँकेकडे कान्सूर, बाभळगाव, लाेणी बु.अंधापूरी, टाकळगव्हाण, टाकळगव्हाण तांडा, तारुगव्हाण, डाकू पिंप्री हे सात गावे दत्तक आहेत. या गावातील शेकडाे शेतकऱ्यांनी खरीपासाठी कर्ज मिळावे म्हणून जुलै महिण्यात माेठी कसरत केली. खर्च करुन कागदपत्रे जमा केली .ती बँकेला दिली. ही कागदपत्रे बँकेच्या वतीने वरीष्ठ कार्यालयात पाठवण्यात आली. त्यानंतर यात ज्या त्रुटी हाेत्या, त्या गेल्या महिण्यात देण्याचे बँक व्यवस्थापकांनी शेतकऱ्यांना सांगितले. त्यानुसार शेतकरी १९ ऑक्टाेबर पासून त्रुटीची कागदपत्रे घेऊन बँकेत चकरा मारत आहेत. मात्र, व्यवस्थापक शिंदे हे निवडणूक कार्यासाठी गेल्याने बँकेतील कर्मचाऱ्यांनी ही कागदपत्रे घेण्यास नकार दिला, असे शेतकरी सांगत आहेत.
मात्र, आता कर्ज मिळेल, पण रब्बी हंगामासाठी, असे बँक व्यवस्थापक सांगत आहेत. परंतु, हे कर्ज तुटपूंजे असल्याने शेतकरी परेशान झाले आहेत. खरीपासाठी खासगी कर्ज घेऊन केलेला खर्च रब्बीसाठी मिळणाऱ्या दहा-वीस हजारात कसा भागवायचा ? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. शाखा व्यवस्थापकाच्या दालनात आज दुपारी बारा वाजल्या पासून शेतकरी ठिय्या मांडून बसले. यामुळे बँकेच्या कामकाजावर परीणाम झाला. तर शेतकऱ्यांनी खरीपासाठी फाईली दिल्या असल्याची कबूली बँक व्यवस्थापक शिंदे यांनी दिली. मात्र, मागील काळात निवडणूक कर्तव्यावर गेलाे हाेताे. या विषयी वरीष्ठांशी चर्चा केली. मात्र, आता रब्बीसाठी या शेतकऱ्यांना कर्ज देऊन परत मार्च-एप्रिलमध्ये पूर्ववत खरीपाचे कर्ज या शेतकऱ्यांना देऊ, असेही व्यवस्थापक शिंदे म्हणाले. दरम्यान, शेतकरी कर्जा विषयी काहीही ऐकण्याच्या मानसिकतेत नाहीत. अतिवृष्टीने सर्व काही गेले. आता खासगी कर्ज आणि घरगाडा कसा चालवावा? असा सवाल करत शेतकरी बँकेत ठाण मांडून बसले आहेत.