परभणी -महाराष्ट्रात सर्वप्रथम 'बर्डफ्लू'ने ग्रस्त कोंबड्या परभणी जिल्ह्यात आढळून आल्या होत्या. हा संसर्ग राज्यातील अन्य भागात पसरू नये म्हणून राज्य शासनाकडून तात्काळ उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, याच उपायोजना आणि 'बर्डफ्लू' ची सद्यपरिस्थिती काय आहे, याचा आढावा घेण्यासाठी आज (मंगळवारी) परभणीत केंद्रीय आरोग्य विभागाचे चार सदस्यीय पथक दाखल झाले आहे. या पथकाकडून परभणी तालुक्यातील मुरुंबा, पेडगाव तसेच सेलू तालुक्यातील कुपटा येथे प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला जाणार आहे.
'बर्डफ्लू'च्या संसर्गामुळे परभणी जिल्ह्यात शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाला. ज्यामुळे हाहाकार उडाला होता. मात्र, जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत या कोंबड्यांचे कलिंग करून त्या नष्ट करण्याचा निर्णय घेतला. परिणामी हा संसर्ग नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला बहुतांश प्रमाणात यश आल्याचे दिसून आले.
'मुरूंब्याच्या 843 कोंबड्यांचा झाला होता अज्ञात रोगाने मृत्यू -
सर्वप्रथम परभणी तालुक्यातील मुरूंबा येथील 843 कोंबड्या अज्ञात रोगाने मृत्यू झाला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासन व पशूसंवर्धन विभागाने तातडीने धाव घेत मृत्यू पावलेल्या कोंबड्या तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविल्या. या कोंबड्यांचा मृत्यू बर्डफ्लूमुळे झाला असल्याचा अहवाल प्राप्त होताच जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह मुरूंबा गावातील एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश दिले. तसेच दहा किलोमीटर परिसरात खरेदी-विक्रीसह अवागमनास प्रतिबंध घातले.
'कुपटा येथील 426 कोंबड्यांचाही मृत्यू -
मुरूंबा येथील बर्डफ्लूचा संसर्ग आटोक्यात येत असतानाच सेलू तालुक्यातील कुपटा येथील 426 कोंबड्यांचा मृत्यू झाला. त्यांचाही अहवाल बर्डफ्लूमुळेच मृत्यू झाल्याचा आल्याने तेथेही उपाययोजना करण्यात आल्या. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे निश्रि्चतच संसर्ग आटोक्यात आणता आला.
'पथक प्रत्यक्ष भेट देऊन करणार पाहणी -
जिल्ह्यात बर्डफ्लू चा संसर्ग झालेल्या ठिकाणांची पाहणी करण्यासाठी व आढावा घेण्यासाठी आज (मंगळवारी) केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाचे चार सदस्यीय पथक परभणीत दाखल झाले. ते पेडगावसह मुरूंबा व कुपटा या गावास भेट देऊन तेथील पाहणी करणार आहेत. या पथकात आरोग्य विभागाचे सार्वजनिक आरोग्य सेवा सल्लागार समितीचे डॉ.सुनील खापरडे, औषधशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. रोहितकुमार, विषाणू शास्त्रज्ञ डॉ.मनोहर चौधरी तसेच औरंगाबाद येथील डॉ.प्रदीप मुरूमकर यांचा समावेश आहे.
'पथकाने पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापकांशी केली चर्चा -
दरम्यान, पथकातील सदस्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील पशूवैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. नितीन मार्कंडेय यांच्यासह डॉ.काकासाहेब खोसे, डॉ. संतोष मोरेगावकर यांच्याशी चर्चा केली. बर्डफ्लूचा संसर्ग झालेल्या गावामधील परिस्थितीसह कारणांबाबत चर्चा केली. प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर भेटी दिलेल्यांशी त्यांनी चर्चा करत त्यांच्याकडून आढावा घेतला. त्याचबरोबर डॉ.प्रशांत सूर्यवंशी, डॉ.सतीश गायकवाड यांच्याशी देखील रोग प्रसाराबाबत आणि स्थलांतरीत पक्षांची भूमिका जाणून घेण्याच्या दृष्टीने चर्चा केल्याची माहिती महाविद्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.