परभणी - गेल्या काही दिवसात परभणी पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी देखील कोरोनाबाधित आढळून येत आहेत. त्यानुसार परभणी शहरातील नवामोंढा पोलीस ठाण्यातील दुसरा पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आला आहे. तर दुपारपर्यंत दोन बाधितांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना देखील घडली आहे. दरम्यान, कोरोनाबाधित पोलिसाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील अन्य 12 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची देखील तपासणी करण्यात आली, सुदैवाने ते सर्व निगेटीव्ह असून, त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.
मंगळवारी दुपारपर्यंत दोन कोरोनाबधितांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये परभणी शहरातील लक्ष्मीनगर येथील 60 वर्षीय पुरुष आणि परभणी तालुक्यातील पेडगावच्या 55 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. प्रशासनाच्या वतीने या दोन्ही रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
दरम्यान, यापूर्वी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नवामोंढा पोलीस ठाण्यातीलच एक कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आला होता. त्यावेळी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकासह अन्य सर्व अधिकारी आणि कर्मचारी क्वॉरंटाईन झाले होते. त्यावेळी सर्व कर्मचाऱ्यांची रॅपिड एंटीजन तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये ते सर्व निगेटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर सोमवारी झालेल्या तपासणीत नवा मोंढा पोलीस ठाण्यातील 45 वर्षीय दुसरा पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आला आहे. त्यामुळे सदर कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेले ठाण्यातील 12 अधिकारी आणि कर्मचारी यांची देखील रॅपिड एंटीजन तपासणी करण्यात आली. त्यात हे सर्व कर्मचारी निगेटिव्ह आढळून आल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र या सर्व कर्मचाऱ्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून कोरोनाबाधित कर्मचाऱ्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.