परभणी- कोरोनाच्या संसर्गामुळे देशभर हाहाकार उडाला असला तरी परभणी जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. संभाव्य रुग्णांची मात्र दिवसेंदिवस संख्या वाढत चालली आहे. एरवी दररोज 10 ते 20 च्या आत असणारे संभाव्य रुग्ण बुधवारी तब्बल 48 वर जाऊन पोहोचले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 417 संभाव्य रुग्णांची नोंद झाली आहे. सध्य परिस्थितीत परभणी जिल्ह्यातील 53 रुग्णांच्या स्वॅबचे नमुने औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात प्रलंबित आहेत. या पूर्वीचे सर्व नमुने निगेटिव्ह आल्याने परभणीचा समावेश ग्रीन झोनमध्ये झालेला आहे.
परभणी जिल्ह्यात सर्वप्रथम सीमा बंदी करण्यात आल्याने कोरोनाचा प्रभाव रोखण्यात प्रशासनाला यश आले. आत्तापर्यंत परभणी जिल्ह्यात एकही कोरोना विषाणूची लागण झालेला रुग्ण आढळून आलेला नाही. असे असले, तरी खबरदारीच्या सर्व उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून केल्या जात आहेत. आरोग्य प्रशासनाकडून जिल्हाभरात आरोग्य तपासण्या सुरू आहेत. शिवाय अनेक नागरिक त्यांना होणाऱ्या त्रासामुळे जिल्हा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासण्या करत आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात तब्बल 417 संभाव्य रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यापैकी 363 रुग्णांचे स्वॅबचे नमुने औरंगाबादच्या शासकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले होते. त्यातील 293 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्या परिस्थितीत 53 अहवाल प्रलंबित आहेत.