परभणी - भाजपचे माजी आमदार मोहन फड यांचा मुलगा पृथ्वीराज फड (20) याचा आज (शुक्रवार) रात्री 9 वाजेच्या सुमारास शहरातील उड्डाणपुलावर दुचाकीच्या अपघातात मृत्यू झाला आहे. त्याच्या दुचाकीला एखाद्या मोठ्या वाहनाने धडक देऊन वाहन तेथून पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात आणताच त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळतात जिल्हा रुग्णालयात परभणीचे खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, डॉ. विवेक नावंदर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे आदींसह राजकीय क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने जमा झाली होती.
माजी आमदार मोहन फड यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर रुग्णालयाजवळ झालेली गर्दी... हेही वाचा...विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणावर अनेकांचे प्रश्नचिन्ह; माध्यमांनाही रोखले होते
परभणी शहरातील गंगाखेड आणि जिंतूर रस्त्याला जोडणाऱ्या उड्डाणपुुलावर शुक्रवारी रात्री 9 वाजता हा अपघात झाला. पृथ्वीराज फड हा बसस्थानकडून आपल्या गंगाखेड रोडवरील माधव नगरी येथील घरी परतत होता. मात्र, उड्डाणपूलावर येताच त्याची दुचाकीची एका मोठ्या वाहनाबरोबर धडक झाली. यात त्याला जबर मार लागल्याने तो जखमी अवस्थेत खाली पडला. मात्र, धडक देणारे वाहन तेथून पसार झाले.
मात्र, तेथून जाणारे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी प्रमोद वाकोडकर यांनी गंभीर जखमी अवस्थेत युवकास पाहून तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतू उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. रात्री 10:15 वाजता त्याचे शवविच्छेदन करण्यात येत होते. तर ही घटना समजताच जिल्हा रुग्णालयात राजकीय मंडळी आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. तसेच फड कुटुंबातील सदस्य देखील मोठ्या प्रमाणात आले होते. या घटनेमुळे फड कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.