परभणी -जिल्ह्यातील 5 तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्रात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गोदापत्रात आता जायकवाडीतून होत असलेल्या सुमारे 1 लाख क्यूसेक पाण्यासोबतच आता माजलगाव प्रकल्पातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या शेकडो गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, गोदावरी नदीतील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणारच आहे, मात्र, सोबतच गोदावरीला पूर येईल, अशी शक्यता जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी व्यक्त केली आहे. जायकवाडी प्रकल्पातून आज (शुक्रवारी) पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास गेट क्रमांक 1 ते 9 असे 9 दरवाजे दीडफूट उघडून त्यातून सुमारे तब्बल 94 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात करण्यात येत आहे. तसेच अन्य दरवाजेही त्यापाठोपाठ दोन फुटांनी उघडण्यात आले आहेत. या जलाशयातील पाण्याची आवक ओळखून परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या नदीपात्रात आज शुक्रवारी दुपारपर्यंत 75 हजार क्युसेकने पाण्याची आवक झाली. त्यामुळे परभणीच्या पाथरी तालुक्यातील ढालेगाव प्रकल्पात 99.28 टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.