परभणी- अलीकडच्या काळात निवडणुकांमधील गैरप्रकार थांबवण्यासाठी उमेदवारांकडून केल्या जाणाऱ्या खर्चाबाबत प्रशासनाचे धोरण कडक झाले आहे. परंतु याउपरही अनेक लोकप्रतिनिधी सहीसलामत सुटतात. मात्र, परभणी जिल्ह्यातील कोल्हावाडीच्या ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचासह व 5 सदस्यांना निवडणुकीतील खर्च सादर न करणे महागात पडले आहे. विभागीय आयुक्तांनी त्यांना चक्क 5 वर्षांसाठी अपात्र ठरवून दणका दिला आहे. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये अडकलेल्या इतर लोकप्रतिनिधींचे धाबे दणाणले आहेत.
मानवत तालुक्यातील कोल्हावाडी ग्राम पंचायतची सार्वत्रिक निवडणूक ऑक्टोबर 2017 झाली होती. ग्राम पंचायतच्या सरपंच आणि इतर उमेदवारांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार खर्च न केल्याने कोल्हावाडीचे माजी सरपंच दिगंबर भिसे यांनी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारदाराचा अर्ज फेटाळाल्यानंतर या प्रकरणी औरंगाबाद विभागीय आयुक्तांकडे अपील करण्यात आले होते. त्यानुसार विद्यमान सरपंच विठ्ठल भिसे आणि इतर 4 सदस्यांनी निवडणूकीचा खर्च स्वतंत्र बँक खाते उघडून केला नाही. तसेच निवडणूक निकलानंतर बँकेत खाते उघडून निवडणुकीसाठी खाते उघडण्यात आल्याचे कागदपत्रे अपिलात सादर करण्यात आले होते.