परभणी - जिल्ह्यातील सेलू येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र गमकरण पाल व पोलीस नाईक गणेश लक्ष्मणराव चव्हाण या दोघांनी एका तक्रारदाराकडून तब्बल 2 कोटी रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती 1 कोटी 50 लाख रुपयांची लाच देण्याचे ठरले होते. त्यापैकी आज दहा लाख रुपयांची लाच स्वीकारली असल्याने त्यांच्यावर सेलूच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी केली असून, या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
'व्हायरल क्लिप प्रकरणातून बाहेर पडायचे असल्यास दोन कोटी दे' -
या संदर्भातील तक्रारदाराच्या मित्राचा अपघाती मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात 3 मे 2019 रोजी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील मयत व्यक्तीच्या पत्नी सोबत तक्रारदाराचे मोबाईलवरील संभाषण व्हायरल झाले. तेव्हा 9 जुलै 2021 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल यांनी तक्रारदाराला त्यांच्या कार्यालयात बोलावून 'तुझी व्हायरल झालेली क्लिप मी ऐकली असून, त्यातून तुला बाहेर पडावयाचे असेल तर मला दोन कोटी रुपये द्यावे लागतील' असे सुनावले.