परभणी - कोरोनाचा धोका टाळण्यासाठी देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, असे असले तरी अनेक महाभाग विनाकारण रस्त्यांवर फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे पोलिसांना नाईलाजास्तव कारवाई करावी लागत आहे. परभणीत आत्तापर्यंत 1 हजार 283 जणांवर 465 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर 1 हजार 530 वाहने जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये गेल्या 24 तासात 49 आरोपींविरुद्ध 12 गुन्हे दाखल झाले आहेत.
परभणीत लॉकडाऊन काळात 1 हजार 283 जणांवर गुन्हे दाखल
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. या काळात अनेकजण आवश्यकता नसतानाही बाहेर फिरत आहेत. अशा बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर परभणी पोलीस कारवाई करत आहेत. परभणीत आत्तापर्यंत 1 हजार 283 जणांवर 465 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये, म्हणून जमावबंदीचा आदेश लागू असतानासुध्दा त्याचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासात पोलीस प्रशासनाने 49 आरोपीविरूध्द 12 गुन्हे दाखल केले आहेत. तर आतापर्यंत जिल्ह्यात 465 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील 1 हजार 283 आरोपिंविरूध्द राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. या प्रमाणेच लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक कारणाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये, विनाकारण रस्त्यावर वाहने घेवून फिरू नये व सामाजिक अंतराचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच दुचाकी, चारचाकी वाहनधारकांकडे वाहने चालविण्याच्या परवान्यासह वाहनांचा विमा, इतर कागदपत्रे आढळून न आल्यास वाहने जप्त केली जातील, असा स्पष्ट इशारा यापूर्वीच जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी दिला होता. मात्र, वेळोवेळी आवाहन करूनही काही लोक विनाकारण रस्त्यावर वाहने घेवून फिरताना आढळून येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्यांची वाहने जप्त केली आहेत. 22 मार्चपासून आजपर्यंत 1 हजार 481 मोटारसायकली व 49 चारचाकी वाहने वाहतूक शाखा व विविध ठाण्यांच्या मार्फत जप्त करून ठाण्यात जमा करण्यात आली आहेत.
आजही विनाकारण अत्यावश्यक कारणाशिवाय रस्त्यावर वाहनांवर फिरणारी मंडळी मोठया प्रमाणावर आढळून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने अजून कठोर भूमिका घेेेतली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर आता रस्त्यावर, अगर बाजारपेठेत वाहने आढळून आल्यास वाहनांसह अन्य कागदपत्राची तपासणी केली जाणार आहे. मोटारवाहन कायद्याप्रमाणे कागदपत्रे नसल्यास दंड वसुल करण्यात येणार आहे. शिवाय वाहन जप्त सुध्दा केले जाणार आहे. त्यामुळे कोणीही विनाकारण रस्त्यावर फिरू नये, संचारबंदीचे पालन करावे व प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक उपाध्याय यांनी केले आहे.