परभणी- शहरातील अनेक पाणी शुद्धीकरण केंद्रांकडून कुठल्याही परवानग्या न घेता तसेच शुद्धीकरणाचे प्रमाणपत्र नसताना सर्रास पाण्याच्या जारची विक्री करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने काही दिवसांपूर्वी या व्यवसायिकांना नोटीस देऊन परवाने तसेच केंद्रीय भूजल प्राधिकरणाचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश बजावले होते. मात्र, बहुतांश उद्योजकांनी कुठलीही कागदपत्रे सादर केलेली नाहीत. या पार्श्वभूमीवर आज (गुरुवारी) महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी परभणी शहरातील 15 पाणी शुद्धीकरण केंद्रांना सील ठोकले आहे.
'कारवाई मागे 'हे' आहे मुख्य कारण'
दरम्यान, परभणी शहरात बहुप्रतिक्षित महापालिकेची नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली आहे. मात्र, प्रत्यक्षात नागरिकांकडून या नवीन नळ योजनेला कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. महापालिकेकडून वारंवार आवाहन करून देखील नागरिक नवीन नळ जोडणी करीत नसल्याने महापालिकेसमोर शहरातील सुमारे 50 हजार मालमत्ताधारकांना नळ जोडणी देण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यातच शहरात शुद्ध पाण्याच्या नावाखाली पाण्याच्या जार पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकांचा सुळसुळाट झाला आहे. एकट्या परभणी शहरात शेकड्याच्या घरात पाणी शुद्धीकरण उद्योग सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांना नवीन नळ जोडणी घेणे आवश्यक वाटत नाही. त्यामुळे सुमारे दोनशे कोटी रुपयांची महापालिकेची महत्त्वकांक्षी पाणीपुरवठा योजना दुर्लक्षित झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका जारच्या माध्यमातून पाणीपुरवठा करणार्या उद्योगांवर कारवाईचा फास आवळत असल्याचे दिसून येत आहे.
'केंद्रीय भूजल प्राधिकरण व अन्न औषधी प्रशासनाचे प्रमाणपत्र आवश्यक'
दरम्यान, परभणी शहरातील पाणी शुद्धीकरण उद्योगांना प्रमाणपत्र सादर करण्यासाठीची नोटीस 9 नोव्हेंबरला महापालिकेच्यावतीने बजावण्यात आली होती. ज्यामध्ये या व्यवसायिकांना केंद्रीय भूजल प्राधिकरण आणि अन्न औषधी प्रशासनाचे प्रमाणपत्र सादर करण्यास सांगण्यात आले होते. या प्राधिकरणाचे प्रमाणपत्र असल्यासच पाणी शुद्धीकरण व्यवसाय सुरू ठेवता येईल, असे स्पष्ट निर्देश या नोटीसमध्ये पालिकेने बजावले होते. परंतु बहुतांश व्यवसायिकांनी हे प्रमाणपत्र घेतलेच नाही, असे या कारवाईतून पुढे आले आहे. ज्यामुळे आज (दि. 19 नोव्हेंबर) परभणी शहरातील 15 पाणी शुद्धीकरण केंद्रांना सील ठोकण्यात आले.
'या' भागातील उद्योगांना ठोकले सील'
दरम्यान, या कारवाईसाठी आयुक्त देविदास पवार व सहायक आयुक्त संतोष वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य स्वच्छता निरिक्षक करण गायकवाड, स्वच्छता निरिक्षक श्रीकांत कुर्हा, गंगाधर करे, प्रकाश काकडे, विनायक बनसोडे, जोगेंदर कागडा आदींचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 12 आणि 16 मधील 15 पाणी शुद्धीकरण उद्योजकांना भेटी देऊन त्यांच्याकडे प्रमाणपत्रांची मागणी केली. पण, कुठलेही प्रमाणपत्र या व्यवसायिकांना सादर करता आले नाहीत. त्यामुळे सदर प्रभागातील ज्ञानेश्वर नगर, माऊली नगर, काकडे नगर, परसावत नगर, वर्मा नगर आणि साखला प्लॉट आदी भागातील या 15 व्यावसायिकांच्या उद्योगांना सील ठोकून कारवाई करण्यात आल्याची माहिती श्रीकांत कुऱ्हा यांनी दिली आहे.