परभणी -जिल्ह्यातील सेलू तालुक्यासह अन्य काही भागात आज (बुधवारी) विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. या अवकाळी बरसलेल्या पावसामुळे काढणीला आलेला गहू, ज्वारी, हरभरा या पिकांसह संत्री आणि आंब्याचे मोठे नुकसान होणार आहे. मागील आठवड्याच्या बुधवार आणि गुरुवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात बऱ्याच प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे देखील अद्याप झालेले नसताना पुन्हा एकदा बळीराजाला नैसर्गिक संकटाने घेरले आहे.
सध्या कोरोनाच्या संकटाने सर्व नागरिक भीतीच्या छायेत असतानाच दुसरीकडे अवकाळी पावसाचे नैसर्गिक संकट ओढवले आहे. विशेष म्हणजे मागच्या बुधवारीच (18 मार्च) परभणी जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी गुरुवारी (19 मार्च) देखील परभणी तालुक्यासह मानवत, सेलू, पालम, पूर्णा, गंगाखेड, सोनपेठ आणि जिंतूर या तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात गारपीट, पाऊस आणि वादळी वाऱ्याचा कहर बरसला. यामध्ये आंबा आणि संत्री या फळांचे मोठे नुकसान झाले. तर, संपूर्ण जिल्ह्यात ज्वारी, गहू तसेच हरभऱ्याचे पीक अक्षरशः आडवे झाले होते. काढणीला आलेली ही पिके जमीनदोस्त होत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास हिरावला जात आहे. त्यात पुन्हा आज संध्याकाळी सेलू शहरासह तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला. सुमारे अर्धा तास पडलेल्या या पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला. त्यामध्ये रब्बीतील काढणीला आलेल्या गहू, ज्वारीच्या पिकासह फळबागांचे नुकसान होणार आहे.