परभणी - कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्यासाठी शेतकऱ्यांच्या बाजूने लोकसभेत आवाज उठविण्याची मागणी करत परभणीत शेतकरी संघटनेच्या वतीने आज शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी कांद्याची रांगोळी काढून त्यात निर्यातबंदीच्या अध्यादेशाची होळी करण्यात आली.
कांद्यावरील निर्यातबंदी उठवा... परभणीत शेतकरी संघटनेकडून खासदारांच्या घरापुढे अध्यादेशाची होळी - परभणीत खासदारांच्या निवासस्थानासमोर शेतकरी संघटनेचे आंदोलन
सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संसाराची राखरांगोळी केली आहे, असा आरोप करत शेतकरी संघटनेच्या वतीने परभणीत शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले. कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्यासाठी शेतकऱ्यांच्या बाजूने लोकसभेत आवाज उठविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.
युद्धसदृष्य किंवा आणीबाणीची परिस्थिती असल्याशिवाय सरकार शेती व्यापारात हस्तक्षेप करणार नाही, असा कायदा असताना केंद्र शासनाने 14 सप्टेंबर रोजी अचानक कांद्यावर निर्यातबंदी घालून स्वतःच कायदेभंग केला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, माधवराव शिंदे, गणेशराव पवार, उद्धवराव जवंजाळ आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.केंद्र शासनाने नुकतेच शेतीमाल व्यापार सुधारणा विधेयक मंजूर केले आहे. कांदा आवश्यक वस्तूंच्या यादीतून वगळला आहे. नवीन कायद्यानुसार शेतकऱ्यांना आपला माल कोठेही विकण्याची मुभा दिलेली आहे.
गेली सहा महिने कांद्याला अतिशय कमी दर होते. त्यावेळेस सरकारने शेतकऱ्यांना कोणतीही मदत केलेली नाही. आता कुठे परवडतील, असे दर मिळायला लागले असताना सरकारने कांदा निर्यात बंद करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. हा निर्णय कांदा उत्पादकांच्या संसाराची राखरांगोळी करणारा आहे. कांदा निर्यातीतून मिळणाऱ्या परकीय चलनामुळे देशाची आर्थिक परिस्थिती सुधारत असताना कांदा निर्यातबंदी करण्याचा निर्णय आत्मघातकी आहे, असा आरोप यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. तसेच सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात कांदा उत्पादकांची बाजू प्रभावीपणे मांडून कांदा निर्यातबंदी कायमची उठवावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.