परभणी - शेतकऱ्यांच्या नावे हजारो कोटींचे कर्ज उचल्याप्रकरणी कारागृहात असलेले आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर लिमिटेड या साखर कारखान्याकडे कामगार आणि शेतकऱ्यांचे दोन वर्षांपासून वाहतूक आणि तोडणीचे पैसे थकीत आहेत. ते आठ दिवसाच्या आत मिळावेत, या मागणीसाठी सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. याठिकाणी घोषणाबाजी करत कारखान्याच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. तसेच थकीत न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
उस वाहतूक आणि तोडणी बिलासाठी शेतकऱ्यांची परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने - farmers agitation against sugar mill owner
कारखान्याने गेल्या दोन वर्षांपासून ऊस तोड आणि वाहतुकीचे थकीत दिलेली नाहीत. सर्व ऊसतोड कामगार आणि वाहतूकदार हे ग्रामीण भागातील आहेत. गेल्या दोन वर्षात नापिकीमुळे हे शेतकरी आणि शेतमजूर हैराण आहेत. त्यातच कारखान्याने पैसे थकवल्याने उसनवारी आणि सावकारी कर्ज वाढल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

गंगाखेड तालुक्यात माखणी येथे गंगाखेड शुगर हा रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचा खाजगी तत्त्वावर चालणारा कारखाना आहे. सध्या आमदार गुट्टे शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर हजारो कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याच्या आरोपाखाली कारागृहात आहेत. तर याच कारखान्याने गेल्या दोन वर्षांपासून ऊस तोड आणि वाहतुकीचे थकीत दिलेली नाहीत. सर्व ऊसतोड कामगार आणि वाहतूकदार हे ग्रामीण भागातील आहेत. गेल्या दोन वर्षात नापिकीमुळे हे शेतकरी आणि शेतमजूर हैराण आहेत. त्यातच कारखान्याने पैसे थकवल्याने उसनवारी आणि सावकारी कर्ज वाढल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या शेतकऱ्यांनी आणि कामगारांनी दिवस-रात्र कारखान्याला ऊस पुरवला. मात्र, कारखाना प्रशासन त्यांचे घामाचे पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांपुढे मोठे संकट ओढवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाहतुकीचे आणि तोडीचे बिल येत्या आठ दिवसात न मिळाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी दिला आहे.
या आंदोलनात भगवान शिंदे, दिगंबर पवार, मुंजाभाऊ लोंढे, शेख जाफर, शेख उस्मान, गणेश चाफळे, विनोद कदम, आप्पासाहेब कदम, बाळासाहेब शिंदे, विष्णुकांत शिंदे, गोविंद भंडारे आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.