परभणी - परतीच्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, ज्वारी आणि इतर पिकांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. परंतु, प्रशासन पंचनाम्याच्या नावाखाली केवळ वेळ काढूपणाचे धोरण अवलंबत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी थेट ५० हजार रुपये नुकसान भरपाई बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावी. तसेच पीकविम्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही जाचक अटी न लावता पीकविमा मंजूर करण्यात यावा. या मागण्यांकरीता भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पाथरीच्या सेलू कॉर्नर येथे गुरूवारी 'रास्ता रोको आंदोलन' करण्यात आले.
तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्या. सन २०१८ चा विमा तत्काळ शेतकऱ्यांचा खात्यात जमा करा. प्रधानमंत्री सन्मान निधीपासून वंचित रहिलेल्या तारुगव्हाण बंधाऱ्याचे काम पूर्ण करा. शेतकऱ्यांच्या खात्यावर सदर निधीचे हफ्ते जमा करा. तसेच अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी. शेतकऱ्यांना व मजूरांना रेशन दुकानातून प्रति व्यक्ती ३५ किलो धान्य पुरवठा करावा. तसेच वंचित शेतकऱ्यांना फळबाग अनुदान वाटप करावे इत्यादी मागणीसाठी दुपारी साडे बारा वाजता सेलू कॉर्नर येथील राष्ट्रीय महामार्गावर हे आंदोलन करण्यात आले.