परभणी- जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. गेल्या २४ जूनला पावसाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर आठ दिवस रोज बरसणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली. परंतु आता पाऊस थांबल्याने पेरण्या कराव्यात की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नजर आता आकाशाकडे लागली आहे.
परभणी जिल्ह्यात पावसाची सरासरी ७७४.२ मिमी एवढी आहे. परंतु गेल्या काही वर्षांत परभणी जिल्ह्यात सरासरीच्या ५० ते ६५ टक्के एवढा पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांना कायम दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यावर्षीदेखील मान्सून लांबल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली होती. परंतु २४ जून रोजी सुरू झालेला पाऊस पुढे ६ दिवस रिमझीम बरसला. २४ ते २९ जूनदरम्यान परभणी जिल्ह्यात ६१.७५ मिलिमीटर एवढा पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीयोग्य वातावरण मिळाले; परंतु, त्यानंतर दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त होत असतानाच गेल्या चार दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे.