परभणी- जिंतूर तालुक्यातील पाचेगांव येथे एका 60 वर्षीय शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाल्याने कर्जाची परतफेड कशी करावी, या आर्थिक विवंचनेतून स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. घटना मंगळवारी (दि.3नोव्हेंबर) घडली असून, या प्रकरणी आज (दि. 5 नोव्हेंबर) जिंतूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रामभाऊ बहिरट असे या शेतकऱ्याचे नाव आहे. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील जिंतूर-औंढा महामार्गालगतच्या पाचेगांव शिवारातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके पूर्णतः नष्ट झाल्याने रामभाऊ बहिरट हे चिंतेत होते. डोक्यावरील कर्जफेडीच्या विवंचनेत त्यांनी मंगळवारी मध्यरात्री स्वतःच्याच शेतामधील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.