परभणी -जिंतूर तालुक्याच्या पिंपळगाव काजळे या गावातील 60 वर्षीय शेतकऱ्याने आज स्वतःच्या शेतातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सदर शेतकऱ्याच्या शेतातील पिकाची अतिवृष्टीमुळे नासाडी झाली असून, यंदाही नापिकी होण्याच्या धास्तीने त्यांनी हे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे.
नापिकीच्या धास्तीने शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या, जिंतूर तालुक्यातील घटना - परभणी ताज्या बातम्या
सततची नापिकी त्यातच यंदा परतीच्या पावसाने कहर केल्यामुळे हाती आलेल्या पिकांचे नुकसान झाले. तर दुसरीकडे महाराष्ट्र बँकेचे कर्ज थकल्याने भास्कर सखाराम थिटे यांना नैराश्य आले होते. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली.
भास्कर सखाराम थिटे (60) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. भास्कर थिटे हे पहाटे चारच्या सुमारास शेतात जातो म्हणून घरातून गेले. मात्र, त्यानंतर त्यांनी शेतात जाऊन एका झाडाला दोरी लावून गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी शेतात गेलेल्या शेजारच्या लोकांनी पहिल्यानंतर त्यांच्या घरच्यांना माहिती मिळाली. तसेच गावकऱ्यांनी देखील पोलिसांना कळवले.
त्यानंतर बामणी पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दरम्यान, सततच नापिकी त्यातच यंदा परतीच्या पावसाने कहर केल्यामुळे हाती आलेले पिकांचे नुकसान झाल्याने तर दुसरीकडे महाराष्ट्र ग्रामस्थ बँकेचे कर्ज थकल्याने त्यांना नैराश्य आले होते. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली. या प्रकरणात बामणी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याची कारवाई सुरू आहे. सदर शेतकऱ्यास पत्नी व एकुलती एकच विवाहित मुलगी आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.