नागपूर/ परभणी- नागपूरसह संपूर्ण विदर्भात थंडीचा जोर आणखी वाढला आहे. आज नागपूरात 7.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर गोंदिया जिल्ह्यात सर्वात कमी 7.4 डिग्री इतके तापमान नोंदवण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील तापमान सामान्यपेक्षा 5 ते 7 अंशाने कमी नोंदवण्यात येत आहे. गोंदिया मध्ये तर सामान्यपेक्षा 6.9 डिग्री तापमान कमी असल्याची नोंद प्रादेशिक हवामान विभागाकडे झाली आहे. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार नागपूरसह विदर्भात थंडीची लाट आलेली आहे. आज सकाळी नागपूरचे तापमान 7.6 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे. नागपूरसाठी आजची सकाळ या मोसमातील सर्वात थंड सकाळ ठरली आहे. उत्तरेकडून येत असलेल्या थंड वाऱ्यांमुळे पुढील काही दिवस नागपूरसह विदर्भात शीतलहरीचा प्रभाव जाणवेल, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाकडून आधीच देण्यात आली आहे. एवढंच नाही तर तापमानाचा पारा सुद्धा दोन ते तीन अंशाने खाली येणार असल्यामुळे आणखी हुडहुडी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. त्यानुसार विदर्भातील बहुतांश जिल्ह्याचे तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली आले आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील आकाश स्वच्छ झाले असून उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड हवेच्या मार्गातील अडथळा देखील दूर झालेले आहेत,त्यामुळे विदर्भात थंडीचा जोर वाढला आहे.
परभणीत पारा घसरला -
मागील काही दिवसांपासून परभणीच्या तापमानाचा पारा घसरत असून, त्यानुसार आज शनिवारी या मोसमातील 5.6 अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान नोंदवण्यात आले आहे. यामुळे परभणीकरांना बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे येणाऱ्या चार दिवसात जिल्ह्यासह मराठवाड्याचे तापमान आणखी ( Temperature in Parbhani ) घसरणार असल्याची शक्यता येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ( Vasantrao Naik Marathwada Agricultural University ) हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोट्यांचा सहारा घेत असून स्वेटर, मफलर, कानटोपी घालूनच घराबाहेर पाडताना दिसत आहेत.
यंदा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात थंडी दाखल झाली होती. मात्र, ऐन दिवाळीत तापमानात वाढ झाल्याने वातावरणातील गारवा नाहीसा झाला होता. त्यानंतर आता पुन्हा तापमानात घट होत आहे. गेल्या काही दिवसांपासून परभणीचे किमान तापमान 10 अंशाच्या खाली आले आहे. त्यात काल शुक्रवारी 8 अंश तर आज शनिवारी तापमानात अडीच अंशाने घट होवून 5.6 अंश एवढ्या निच्चांकी तापमानाची नोंद येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामानशास्त्र विभागात झाली आहे. या वर्षातील हे आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान असून यापुढे त्यात आणखी घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मराठवाड्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद परभणीत होत असते. त्या प्रमाणेच किमान तापमानाची देखील नोंद येथेच झालेली आहे. 2 अंश इतकी निच्चांकी तापमानाची नोंद 29 डिसेंबर 2018 रोजी झाली होती. याप्रमाणेच 17 जानेवारी 2003 ला 2.8 आणि 18 डिसेंबर 2014 रोजी 3.6 अंश एवढया निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.
विदर्भातील जिल्ह्यांचे आजचे तापमान -
- अकोला 9.1 अंश सेल्सिअस - सामान्यपेक्षा 5.7 डिग्री कमी
- अमरावती 10.2 अंश सेल्सिअस - सामान्यपेक्षा 5.1 डिग्री कमी
- बुलढाणा 9.2 अंश सेल्सिअस - सामान्यपेक्षा 6.5 डिग्री कमी
- गडचिरोली 8.6 अंश सेल्सिअस - सामान्यपेक्षा 7 डिग्री कमी
- गोंदिया 7.4 अंश सेल्सिअस - सामान्यपेक्षा 6.9 डिग्री कमी
- नागपूर 7.6 अंश सेल्सिअस - सामान्यपेक्षा 6.5 डिग्री कमी
- वाशीम 13.0 अंश सेल्सिअस - सामान्यपेक्षा 6 डिग्री कमी
- वर्धा 8.8 अंश सेल्सिअस - सामान्यपेक्षा 5.5 डिग्री कमी
- यवतमाळ 10.5 अंश सेल्सिअस - सामान्यपेक्षा 5.7 डिग्री कमी