परभणी -केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याची भाषा करण्याऐवजी केंद्रांमध्ये राहून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काय करता येईल, ते पाहावे तसेच दानवेसारखे दहा 'दानव' तयार झाले तरी हे 'मानव'तेच सरकार ते पाडू शकणार नाहीत, असा टोला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील उमेदवार प्रा. सचिन ढवळे यांच्या प्रचारानिमित्त परभणीत आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्यमंत्री बच्चू कडू यांची प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांच्यावर द्वेषापोटी कारवाई- शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर 'ईडी'कडून होत असलेल्या कारवाई बद्दल बोलताना बच्चू कडू म्हणाले की, 'गेल्या 10 वर्षात सत्तेच्या माध्यमातून चांगल्या कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्याचे काम होत आहे. त्याचा आवाज दाबण्याचा सत्तेततील जो प्रयोग आहे, तो थांबला पाहिजे. सध्या मोगलशाहीसारखे काम चालले आहे, ते उचित नाही. मला नाही वाटत की प्रताप सरनाईक दोषी असतील. ही केवळ द्वेषापोटी झालेली कारवाई आहे. ही हुकूमशाही चाललेली आहे. लोकशाहीतून निवडून यायचे आणि हुकुमशाही करायची, हे चुकीचे आहे, ते आम्ही हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही.
वर्धेप्रमाणे अन्य जिल्ह्यातील शाळांवरही कारवाई-
वर्धेतील एका शाळेने 2014 ते 2019दरम्यान पालकांकडून तब्बल साडेचार कोटी रुपये जास्तीचे वसूल केले. हे लेखा परीक्षणांमध्ये निष्पन्न झाले आहे. राज्यात हे पहिल्यांदा झाले आहे. त्यामुळे ते साडेचार कोटी शाळेने पालकांना परत दिले पाहिजे, ते वापस केले नाही, तर पुढची कारवाई करण्यात येईल. सध्या कोरोनाची लाट आहे, ती ओसरल्यावर मी स्वतः सर्व जिल्ह्यात फिरणार आहे. जेथे जेथे अशा तक्रारी असतील, त्या ठिकाणच्या पालकांच्या पाठीशी उभे राहणार, असल्याचेही कडू म्हणाले.
उमेदवार देण्याविषयी नंतर बोलणार-
महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री पदावर असलेल्या बच्चू कडू यांनी पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत महाविकास आघाडीच्याच उमेदवाराविरोधात प्रहार पक्षाचा उमेदवार उभा केला आहे. याबाबत विचारले असता, बच्चू कडू यांनी सध्या तरी चुप्पी साधली आहे. याप्रकरणी आपण नंतर प्रेस घेऊन बोलणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, महाविकास आघाडीत पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार वाटपावरून काही बेबनाव झाला काय, अशी शंका यानिमित्ताने उपस्थित झाली आहे.
हेही वाचा- 'प्रताप सरनाईक आणि वायकर हा मुखवटा; खरा कलाकार कलानगरमध्ये बसलाय'