परभणी -येथील जिल्हा रुग्णालयात 12 तासांत दोन वेळा आग लागल्याची घटना घडली आहे. पहिल्या घटनेत जुन्या ओपीडीच्यावरील एका खोलीला आग लागली, तर दुसऱ्या घटनेत धोबीघाट येथे कपड्यांना आग लागली. एकापाठोपाठ एक लागलेल्या आगीच्या घटनांची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी समिती नेमली आहे. तर याप्रकरणी अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश डाके यांच्या तक्रारीवरून अज्ञातांवर गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.
अपघात विभागातील साहित्याला आग-
जिल्हा शासकीय रुग्णालयातील अपघात विभागाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील साहित्याला आग लागल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. ही घटना शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत कोणतीही जीवितहाणी झाली नाही. तसेच वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, आग लागल्याचे समजताच अपघात विभागातील रुग्ण तातडीने बाहेर काढण्यात आले होते. सोबतच या घटनेची माहिती पोलीस व अग्निशमन दलास देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानानी तातडीने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
12 तासात आगीची दुसरी घटना -
दरम्यान, शनिवारी रात्री लागलेल्या आगीपाठोपाठ रविवारी रात्री पुन्हा जिल्हा शासकीय रुग्णालयातील लाँड्री विभागास (धोबीघाट) आग लागल्याने रुग्णांसह परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या आगीत तेथील काही साहित्य जळून खाक झाले. आग लागल्याचे लक्षात येताच तेथील कर्मचार्यांसह नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याचबरोबर अग्नीशमन दलाला या घटनेची माहिती देण्यात आली. अग्नीशमन दलाचे दिपक कानोडे, सर्जेराव मुंडे, इनायत अली, वसीम अखील अहेमद, पंढरीनाथ कालाने, जलील अहेमद खान आदींनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली.
जाणीवपूर्वक आग लावल्याचा संशय;गुन्ह दाखल -
जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश डाके यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्याप्रमाणे शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास ओपीडीच्या टेरिसवर जुने मोडकळीस आलेल्या फर्निचरला अचानक आग लागली होती. तसेच रविवारीदेखील ओपीडीच्या बाजूस असलेल्या धोबी रूममध्ये आग लागून तेथे धुलाइसाठी आलेले रुग्णालयातील कपडे जळून अंदाजे 20 हजार रुपयांचे नुकसान झाले. मात्र, यातील धोबीघाटच्या मागील बाजूस असलेला कचरा जमा करून त्यास आग लाऊन खिडकीतून आतमध्ये टाकल्यासारखे दिसून येत आहे, असे त्यात म्हटले आहे. या या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.