परभणी- मराठवाड्यात 1972 पासून सातत्याने दुष्काळ पडत आहे. या ठिकाणच्या जनतेला दुष्काळाचा कायम फटका बसत असून जनावरांसाठी सध्या पाणी नाही, तर प्यायला हंडाभर पाणी पाच रुपयांना विकत घ्यावे लागत आहे. ही परिस्थिती आपण आपल्या डोळ्यांनी पाहिली. या दुष्काळाचे अनेक नेत्यांनी राजकारण केले. मात्र, शिवसेनेना प्रत्येक वेळी मदतीसाठी धावून आली, त्यांना मदत केली, असे वक्तव्य पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज (शनिवार) परभणीत केले.
पर्यावरण मंत्री रामदास कदम दुष्काळग्रस्तांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शिवसेनेच्या वतीने परभणीच्या नवा मोंढा भागात स्थापन करण्यात आलेल्या मदत केंद्राचे उद्घाटन आज दुपारी रामदास कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री गुलाबराव पाटील, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील हे देखील उपस्थित होते.
या ठिकाणी प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या पीक विमा संदर्भात उद्भवलेल्या प्रश्नांची तसेच समस्यांची सोडवणूक केली जाणार आहे. यावेळी बोलताना रामदास कदम म्हणाले, पीक विमा वाटपात शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे, हे आमच्या लक्षात येताच आम्ही शेतकऱ्यांसाठी धावून जाण्याचे ठरवले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तत्काळ अधिवेशन सोडा, सर्व बैठका सोडून द्या आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दौरे करण्याचे आदेश दिले, त्याप्रमाणे आम्ही मराठवाड्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलो आहोत. मात्र, यापूर्वीच परभणीचे खासदार संजय जाधव यांनी हा प्रश्न दिल्लीपर्यंत नेला. दिल्लीतील सरकारला त्यांनी पीक विम्याचे वास्तव निदर्शनास आणून दिले.
त्यानंतर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 70 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला. असेच काम आता शिवसेनेला संपूर्ण महाराष्ट्रात तालुकानिहाय करायचे आहे. पीक विम्याच्या बाबतीत अधिकारी आणि पीक विमा कंपनीवाल्यांनी संगनमत करून शेतकर्यांची फसवणूक केली. चांगल्या पिकांचा पंचनामा केला जातो आणि ज्या ठिकाणी पिके हातची गेली आहेत, त्या ठिकाणी मात्र पंचनामा करत नाहीत, ही सरळ सरळ शेतकऱ्यांची फसवणूक आहे. त्यामुळे पीक विम्याचे पैसे विमा कंपन्यांकडून वसूल करायलाच पाहिजे आणि यासाठी आपण आता मुंबईत शिवसेनेच्या माध्यमातून आवाज उठवणार असल्याचेही शेवटी रामदास कदम म्हणाले.