परभणी- जिल्ह्यातील गंगाखेड शहरातील बस स्थानकाजवळ अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून ठाण मांडणाऱ्या तब्बल 95 दुकानांवर आज (दि. 3 ऑक्टोबर) प्रशासनाने तोडक कारवाई केली आहे. ही सर्वच्या सर्व दुकाने जमीनदोस्त करण्यात आली आहेत.
बसस्थानकासमोर उड्डाणपुलाचे काम सुरू असून, उड्डाणपुलाच्या कामाला या दुकानांचा अडथळा होत होता. शिवाय बस स्थानकापुढील रस्ता अतिक्रमित दुकानांमुळे अरुंद बनल्याने वाहतुकीची समस्या नेहमीच भेडसावत होती. यामुळे प्रशासनाने कठोर भूमिका घेऊन ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे या अतिक्रमीत दुकानधारकांनी गेल्या तीन दिवसांपासून आपली दुकाने पाडू नयेत, म्हणून उपोषण सुरू केले होते. पण, प्रशासनाने त्यांच्या या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून आपली कारवाई पूर्ण केली आहे.
दरम्यान, मागील 20 ते 25 वर्षांत ही 95 अतिक्रमित दुकाने हळूहळू त्या ठिकाणी प्रस्थापित झाली आहेत. 2016 मध्ये उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू झाले त्यावेळी या दुकानदारांना नोटीस देऊन जागा रिकामी करण्याचे सांगण्यात आले होते. पण, याकडे त्यांनी दुर्लक्ष केले.
गंगाखेड नगरपरिषदेने वेळोवेळी ही अतिक्रमणे उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेकवेळा राजकीय हस्तक्षेपामुळे ही कारवाई थांबली होती. पण, आता उड्डाणपुलाचे काम हे अत्यंत महत्त्वाकांक्षी असून त्या कामाला अडथळा येत असल्याने प्रशासनाला नाईलाजास्तव अतिक्रमण हटविण्याची कारवाई करावी लागली. आज (शनिवार) दुपारपासून 3 ते 4 बुलडोजरच्या सहाय्याने बसस्थानकाजवळील ही दुकाने पाडण्यास सुरुवात झाली. अनेकांनी या ठिकाणी येऊन विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांचा मोठा फौजफाटा असल्याने दुकानदाराचा हा विरोध चालला नाही. गेल्या तीन दिवसांपासून उपोषण करणाऱ्या या दुकानदारांची प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. दुपारी सुरू झालेले हे पाडकाम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.
याठिकाणी किराणा, कटलरी व फळांची दुकाने तसेच मोबाईल शॉपी आणि पानटपऱ्या असे सर्वच प्रकारचे व्यवसाय चालत होते. या कारवाईमुळे मात्र व्यावसायिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार हे मात्र नक्की. असे असले तरी या अतिक्रमित दुकानांवर झालेल्या कारवाईमुळे बसस्थानकाजवळील रस्ता रुंद होणार असून, यामुळे उड्डाणपुलाच्या कामाला पर्यायी रस्ता मिळून उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण होऊ शकेल. या कारवाईसाठी महसूल बांधकाम आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा -परभणीत काँग्रेसकडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन