परभणी- पालम शहरात काल (बुधवारी) घडलेल्या जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनेनंतर आज दुसऱ्या दिवशी सर्वसामान्य नागरिकांवरील दहशत कायम असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, या ठिकाणची बाजारपेठ बंद आहे. यामुळे शहरातील सर्व व्यवहार ठप्प आहेत. सर्वत्र तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लागला आहे. दरम्यान, या प्रकरणात सुमारे तीनशे ते साडेतीनशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांपैकी ८ जणांना अटक करण्यात आली आहे.
पालममध्ये अजूनही दहशत; आठ जणांना अटक - police station
परभणीतील पालम शहरात काल (बुधवारी) घडलेल्या जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनेनंतर आज दुसऱ्या दिवशी सर्वसामान्य नागरिकांवरील दहशत कायम असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, या ठिकाणची बाजारपेठ बंद आहे. यामुळे शहरातील सर्व व्यवहार ठप्प आहेत.
पालम येथे दोन तरुणांमध्ये उद्भवलेल्या किरकोळ वादाचे रूपांतर काल (बुधवार) दंगलीत झाले होते. ज्यात पालमच्या मुख्य रस्त्यावरील पान टपऱ्या, चहाची हॉटेल्स आणि इतर काही किरकोळ दुकानांना समाजकंटकांनी लक्ष्य केले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. शिवाय समाजकंटकांनी रस्त्यावरील डझनभर मोटरसायकली जाळून टाकल्या होत्या. तसेच अनेक चारचाकी वाहनांवर दगडफेक करून त्या वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.
जाळपोळीत भस्मसात झालेल्या मोटारसायकली एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये भरून पोलीस ठाण्यात लावण्यात आल्या आहेत. शहरातील मुख्य रस्त्यासह ताडकळस रोडवर पोलिसांचा बंदोबस्त असून बाजारपेठ कडकडीत बंद आहे. सर्वत्र तणावपूर्ण शांतता आहे. पोलीस या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून रात्री उशिरा नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक प्रकाश मुत्याल, पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी सुमारे तीनशे ते साडेतीनशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील आठ जणांना अटक करण्यात आली असून, इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. धरपकडीच्या भीतीने अनेक तरुण शहरातून फरार झाले आहेत. पोलिसांनी रात्रीच नाकाबंदी करून यातील आठ जणांना ताब्यात घेतले होते. तर आज गुरुवारी इतर आरोपींच्या अटकेसाठी परभणीहून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पालममध्ये दाखल झाले आहेत. एकूणच पालमची परिस्थिती गंभीर असून उद्या त्यात सुधारणा होऊन सर्व व्यवहार सुरळीत होतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.