परभणी -परभणी जिल्ह्यात पावसाने कमालीची दडी मारली आहे. गेल्या काही दिवसात तर परभणी जिल्ह्यात पावसाळा आहे का, उन्हाळा? हेच समजत नाही. परिणामी पिके तर करपून जातच आहेत, सोबतच जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे शेतकरी काळजावर दगड ठेवून जीवापाड जपलेले हे पशुधन मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. मात्र, या पशूधनाला ही भाव मिळत नसल्याने बळीराजा आता पुरता हताश झाला आहे.
चारा अन पाण्याआभावी शेतकऱ्यांनी पशुधन काढले विक्रीला, भाव मिळत नसल्याने बळीराजा हताश परभणी जिल्ह्यात गेल्या काही वर्षाप्रमाणे याही वर्षी दुष्काळाचे संकट कायम आहे. पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा काळ लोटला आहे. मात्र, सरासरीच्या केवळ 27 टक्के पाऊस झाल्याने जमिनीत साधी ओल देखील निर्माण झालेली नाही. सुरुवातीलाच लांबलेला पाऊस जुलै महिन्याच्या सुरुवातीला कसाबसा बरसला. याच पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, पावसाने आता पुन्हा दडी मारल्याने उगवलेले पीक जगेल की नाही, अशी भीती निर्माण झाली आहे.
पिके तर हातची गेलीच. पण जीवापाड जपलेली जनावरे कशी जगवावी, असा प्रश्ना शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे परभणीच्या गुरुवारच्या बाजारात आज शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपले पशुधन विक्रीसाठी आणले. जनावराला लागणाऱ्या चाऱ्याची पेंढ 60 रुपयांना झाली आहे. एका जनावराला 4 ते 5 पेंढी दररोज लागतात. कुठून करायचा हा खर्च, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. आम्हालाच प्यायला पाणी नाही तर जनावरांना कुठून आणायचे? असा सवाल आता शेतकरी उपस्थित करू लागला आहे.
त्यामुळे 'पोटच्या लेकराप्रमाणे लहानाची मोठी केलेली जनावरे नाईलाजास्तव बाजारात आणून विकावी लागत आहेत. मात्र, त्या जनावरांनाही कोणी घ्यायला तयार नाही. साधी विचारपूसही करायला कोणी येत नाही, अशी नाराजी शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळे जनावरे विकून उदरनिर्वाह भागवावा म्हटले तर तेही शक्य होताना दिसत नाही. निम्मा पावसाळा संपला तरी देखील ही परस्थिती असल्याने येणाऱ्या काळात आणखीन किती संकटांना तोंड द्यावे लागणार हा प्रश्न आता शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे शासनाने उपाययोजना करून दुष्काळाच्या सवलती लागू कराव्यात, अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून होत आहे.