महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नियमांचे पालन न करणाऱ्यांवरच्या कारवाईसाठी जिल्हाधिकारी उतरले रस्त्यावर - parbhani corona update

दुपारच्या सुमारास शहरातील मुख्य बाजारपेठेत सार्वजनिक ठिकाणांची पाहणी केली. यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले.

deepak muglikar
deepak muglikar

By

Published : Feb 23, 2021, 5:50 PM IST

Updated : Feb 23, 2021, 5:56 PM IST

परभणी - वारंवार सांगूनही कोरोनासंदर्भात नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने आज (मंगळवारी) जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना कारवाईसाठी स्वतःला रस्त्यावर उतरावे लागले. त्यांनी दुपारच्या सुमारास शहरातील मुख्य बाजारपेठेत सार्वजनिक ठिकाणांची पाहणी केली. यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले, तर दुकानदारांना कोरोनाच्या संदर्भातील नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे बजावले.

नियमांचा होत आहे सर्रास भंग

महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यानुसार परभणी देखील नव्याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्यादेखील झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. मास्क, शारीरिक आंतर आणि सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत. मात्र, या नियमांचा नागरिकांकडून सर्रास भंग होत असल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर हे आज (मंगळवारी) स्वतः रस्त्यावर उतरले.

मुख्य बाजारपेठेची केली पाहणी

जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी यावेळी सिटी क्लब, नारायण चाळ परिसर, गांधी पार्क, गुजरी बाजार, शिवाजी चौक, सुभाष रोड, वसमत रोड आणि बसस्थानक परिसरात रस्त्यावर उतरून पाहणी केली. प्रत्यक्ष रोडवर फिरणाऱ्या नागरिकांना मास्क लावण्याचे आवाहन केले. काही वाहनधारक विनामास्क आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाईचे आदेशदेखील त्यांनी संबंधितांना दिले. काही दुकानांमध्ये व्यवसायिक विनामास्क असल्याचे त्यांना आढळून आले. त्या दुकानदारांवरदेखील दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.

बँकेत गर्दी, कर्मचारीच होते विनामास्क

जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीत त्यांना शिवाजी चौकातील एका बँकेसमोर ग्राहकांची प्रचंड गर्दी दिसून आली. यावेळी बँकेतील कर्मचारीदेखील त्यांना विनामास्क असल्याचे आढळले. त्यावेळी त्यांनी व्यवस्थापकांची कानउघडणी केली. कर्मचाऱ्यांना तत्काळ मास्क उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी त्या व्यवस्थापकाला दिले. तसेच ग्राहकांची गर्दी न होवू देता त्यांच्यात सोशल-डिस्टन्स ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना देखील त्यांनी केल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सोबत उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर, तहसीलदार संजय बिरादार, उपायुक्त प्रदीप जगताप, सहायक आयुक्त श्रीकांत कांबळे, स्वच्छता निरीक्षक मोहंमद शादाब, न्यायरत्न घुगे, श्रीकांत कुरा, विकास रत्नपारखे, पोलीस कर्मचाऱ्यांच्यासह महसूल आणि मनपाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Last Updated : Feb 23, 2021, 5:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details