परभणी - गेल्या सहा दिवसांपासून जिल्ह्यातील शिक्षकांचे अनुदान मागणीसाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. त्याअंतर्गत आज (सोमवारी) जिल्ह्यातील जवळपास सर्वच शाळा महाविद्यालयांनी बंद पाळून शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. यामध्ये सुमारे 800 प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसह कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. मात्र या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे संवर्धन मंडळाच्यावतीने घेण्यात येणारी आजची घटक चाचणी परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे.
20 टक्के अनुदानित प्रचलित नियमानुसार वेतन अनुदान देण्यात यावे, राज्यातील अघोषित प्राथमिक, माझ्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तथा महाविद्यालयांना घोषित करून प्रचलित नियमानुसार त्वरीत अनुदानित करण्यात यावे, विना अनुदानित, अंशत: अनुदानित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण देण्यात यावे, वर्ष 2012-13 च्या वर्ग तुकड्या मुल्यांकन करून निधीसह घोषित कराव्यात, या मागण्यांसाठी सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने बुधवार 21 ऑगस्टपासून येथे साखळी उपोषण सुरू आहे. मात्र, प्रशासन आणि शासन या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने शिक्षकांच्या या आंदोलनाला अद्यापही यश आले नाही.