महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दाजीसाठी मेहुणे आले धावून, धनंजय मुंडेची गंगाखेडमध्ये सभा - धनंजय मुंडेची गंगाखेडमध्ये सभा

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची आज (शुक्रवारी) सायंकाळी गंगाखेड येथे सभा होणार आहे. मुंडे यांचे दाजी तथा गंगाखेडचे विद्यमान आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्या प्रचारासाठी ही सभा आहे.

संपादित छायाचित्र

By

Published : Oct 18, 2019, 1:13 PM IST

परभणी- विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची आज (शुक्रवारी) सायंकाळी गंगाखेड येथे सभा होणार आहे. मुंडे यांचे दाजी तथा गंगाखेडचे विद्यमान आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्यासाठी ही लढाई अतितटीची आहे. ते एकाकी खिंड लढवत आहेत. त्यामुळे त्यांच्या विजयासाठी स्वतः धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दरम्यान, आमदार केंद्रे यांना अगदी शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाली होती. त्यावेळी देखील धनंजय मुंडे यांना संघर्ष करावा लागला होता.


जिल्ह्याचे लक्ष गंगाखेड विधानसभा मतदारसंघाकडे असते. श्रीमंत उमेदवारांचा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे. याठिकाणी बहुरंगी लढत होत आहे. रिंगणात थोडेथोडके नव्हे तर तब्बल सहा तुल्यबळ उमेदवार असून त्यांच्यामध्ये हा निवडणुकीचा फड रंगला आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांचा सामना शिवसेनेचे विशाल कदम, रासपचे रत्नाकर गुट्टे, अपक्ष तथा माजी आमदार सीताराम घनदाट, वंचित बहुजन आघाडीच्या करुणा कुंडगीर आणि पूर्वाश्रमीचे सेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा अपक्ष उमेदवार संतोष मुरकुटे यांच्याशी होत आहे.

हेही वाचा - परभणीतील उपमहापौरांच्या घरी पोलिसांची छापा; मतदारांना पैसे वाटण्याचा होता संशय

गंगाखेड मतदारसंघाचा गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहिला असता, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा वापर होतो. जो यात सरस ठरेल, त्याचा विजय निश्चित, असे काहीसे सूत्र पाहायला मिळते. मात्र, मागच्या निवडणुकीत धनशक्तीच्या तुलनेत गंगाखेडच्या मतदारांनी आमदार मधुसूदन केंद्रे यांची तळमळ लक्षात घेतली. त्यास महत्त्व देऊन निवडून दिले. परंतु मागच्या पाच वर्षात त्यांना आपल्या कार्यपद्धतीतून जनतेवर फारसा प्रभाव पाडता आला नाही. परिणामी जनतेतून मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. शिवाय लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याचा ठपका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ठेवला आहे. त्यामुळेच त्यांच्या उमेदवारीचा निर्णय अगदी शेवटच्या टप्प्यात झाला.


सध्या ते एकाकी खिंड लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी गंगाखेड मतदारसंघाकडे फिरकत सुद्धा नाहीत. त्यामुळे आता त्यांच्या मदतीला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे पुन्हा एकदा धावून आले आहेत. आज (शुक्रवारी) संध्याकाळी त्यांची गंगाखेड येथे जाहीर सभा होणार आहे. या जाहीर सभेत ते काय भूमिका मांडतात आणि गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील जनतेला कुठली आश्वासने देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, गंगाखेड येथील आंबेडकर चौकात संध्याकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे.

हेही वाचा - मतदारांना बल्क एसएमएस पाठवून प्रचार; निवडणूक आयोगाची काँग्रेस उमेदवाराला नोटीस

ABOUT THE AUTHOR

...view details