परभणी- 'महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी पीक विम्याबाबत विमा कंपन्या आणि केंद्र सरकारच्या विरोधात बोलण्याऐवजी पीक विम्याचे निविदा योग्य प्रकारे कसे निघेल, त्याच्या अटी-शर्ती योग्य कशा असतील, हे पाहणे आवश्यक होते. उलट आमच्या 2015 ते 19 च्या काळात 576 कोटी रुपये ज्यावर्षी शेतकऱ्यांनी भरले, त्यावर्षी आम्ही शेतकऱ्यांना 4 हजार कोटी रुपयांचा लाभ मिळवून दिला. मग आता ते का मिळत नाहीत, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. तसेच 'आपले अपयश लपवायचे आणि लोकांना खोटे सांगून त्यांची दिशाभूल करायचे काम राज्य सरकार करत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवारी) परभणी शहरातील जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीत असलेल्या कोविड सेंटरला भेट दिली. यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना परिस्थितीचा आणि खरीप हंगामाचा देखील आढावा घेतला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत आमदार मेघना बोर्डीकर, शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, सुरेश भुमरे आदींसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
परभणीत तिसऱ्याला लाटेचीही तयारी; समाधानाची बाब
परभणीत 40 हजाराहून अधिक रुग्ण या लाटेत आढळले आहेत. तसेच या ठिकाणचा मृत्यूदरही जास्त असल्याने ती एक चिंतेची बाब आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने तिसऱ्या लाटेची तयारी होत असल्याचे सांगितले. ही समाधानाची बाब आहे. मात्र, मी म्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याची सूचना जिल्हा प्रशासनाला केली आहे. या संदर्भात योग्य काळजी घेतल्यास मोठ्या प्रमाणात मृत्यूदर थांबवता येतील, असेही फडणवीस म्हणाले.
खासगी रुग्णालयांचे ऑडिट शासनाला करावेच लागणार
दरम्यान, राज्य शासनाने कोरोना संदर्भातील उपचारांच्या दरांबाबत काल (दि. 1 जून) घोषणा केली. मात्र, 50 लाखांहून अधिक रुग्ण झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आल्याने खूप उशीर झाला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत शहरी तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना लाखो रुपयांची बिले भरावी लागली. पण, उशिरा का होईना पण ही घोषणा केल्याने ही एक समाधानाची बाब आहे. तसेच खासगी रुग्णालयांनी यापूर्वी रुग्णांकडून जी बिले आकारली त्याचे ऑडिट शासनाला करावेच लागणार आहे. कारण न्यायालयाने या संदर्भातील विशेष आदेश दिले आहेत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.