परभणी- सरकारने 25 हजार देऊ, 50 हजार देऊ, अशी घोषणा करत अद्याप शेतकऱ्यांना फुटकी कवडीही दिली नाही. आता केवळ कोरडी आश्वासने दिली जात आहेत. रोज नवीन कारणे सांगितले जातात. कधी सांगतात केंद्रातून पैसा यायचा आहे, कधी सांगतात राज्यातून पैसा यायचा आहे, कधी सांगतात बँकेतून पैसे यायचा आहे. पण, ज्याला मदत करायची असते, त्याला बहाणे कधीच सुचत नाहीत. महाराष्ट्र हे समृद्ध राज्य आहे. आपल्याला अजून 60 हजार कोटी रुपयांपर्यंत कर्ज काढता येते. फक्त शेतकऱ्यांना मदत करायची नियत आहे का ? हा प्रश्न आहे, असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारपुढे उपस्थित केला.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकर्यांच्या बांधांवर फिरून पिकांची पाहणी करत आहेत. आज (बुधवारी) ते परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात असलेल्या पाचेगाव येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'गेल्या दहा दिवसात मराठवाड्यामध्ये प्रचंड अशी अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीत पिकांचे अभूतपूर्व असे नुकसान झाले आहे. 24 तासांत सरासरीच्या 300 ते 500 टक्के देखील पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी ढग फुटल्यासारखा पाऊस पडला. याचा परिणाम हातातोंडाशी आलेली जवळजवळ सर्वच पिके गेली. मराठवाड्यात पहिली पेरणी शेतकऱ्यांनी केली तेव्हा बियाणे बोगस निघाले, दुसऱ्या पेरणीचे बियाणे देखील बोगस निघाले आणि तिसऱ्या पेरणीच्या पिकांना शेंगा भरत आले असतानाच अतिवृष्टी झाली. यात सर्वच पिके नष्ट झाली आहेत. अशीच अवस्था कापसाची देखील आहे. काही ठिकाणी बोंडा फुटलेली दिसत आहेत. मात्र, अजून चार-पाच दिवसांनी ही बोंडे देखील नष्ट होतील, अशी अवस्था आहे. हीच अवस्था तुरीची, मक्याची आणि उसाची देखील झाली आहे. मात्र, असे असतानाही या सरकारने अजूनही 90 टक्के ठिकाणी पंचनामे केले नाहीत. आता पंचनामे होतील कधी आणि प्रत्यक्षात मदत मिळेल कधी ? असा सवाल देखील देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.