परभणी -तालुक्यातील संबर आणि परिसरातील अनेक गावांमध्ये हरणांचा सुळसुळाट झाला आहे. रानडुक्कर आणि रोही देखील नुकतेच उगवलेले पिके नष्ट करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले असून, भविष्यात देखील काढणीला आलेले पीक या वन्यप्राण्यांकडून नष्ट केल्या जाण्याची भिती आहे. त्यामुळे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी. तसेच या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा एखाद्या अभयारण्यामध्ये ते नेऊन सोडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
दुबार, तिबार पेरणी करण्याची वेळ -
गेल्या सहा-सात वर्षांपूर्वी परभणी तालुक्यातील संबर आणि परिसरातील काही गावांमध्ये 3-4 हरण आले होते. आता ते प्रचंड संख्येने वाढले असून, त्यांचा मोठा कळप बनला आहे. हा शेतकऱ्यांसाठी प्रचंड डोकेदुखीचा विषय ठरला आहे. या हरणाच्या त्रासामुळे शेतकरी वैतागले असून, हे हरण नुकतेच उगवलेले लहान रोपे खाऊन टाकत आहेत. त्यामुळे ते पीक मुळासकट नष्ट होत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पेरलेले काहीच हाती येणार नाही. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार तसेच तिबार पेरणी करण्याची वेळ आली आहे.
तालुक्यातील सर्वच गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान -
तसेच सांबरसह सावंगी, मटकऱ्हाळा, साडेगाव आदींसह संपूर्ण तालुक्यातील गावांमध्ये कमी अधिक प्रमाणात हरणांसह रानडुकरे आणि वानरांनी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. यामुळे शेतकरी अक्षरशः वैतागला आहे. शासनाने तत्काळ उपलब्ध करण्याची मागणी संबर गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.